नाशिक जिल्ह्यात 3 टँकर सुरू धरणसाठा 42 टक्क्यांवर

0

नाशिक : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून जिल्ह्यात 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बागलाणमध्ये 2 आणि मालेगावला एका टँकरने तहान भागवली जात आहे. विशेष म्हणजे बागलाणमध्ये 2-3 गावांनी नव्याने टँकर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याने त्या वाढीची शक्यता आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने पाण्याची चिंता राहणार नसल्याचे सांगितले जात होते. परंतु यंदा उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागल्याने टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होऊ लागले आहेत. मात्र असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. फेबु्रवारीअखेरपर्यंंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता. याच तुलनेत गेल्यावर्षी सुमारे 60 टँकरद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची तहान भागवली जात होती. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बागलाणमध्ये 2 टँकर सुरू झाले आहेत. तर नव्याने 2-3 गावांनी टँकरची मागणी केली आहे.

मालेगावमध्ये एक टँकर सुरू करण्यात आला असून नांदगाव तालुक्यात विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यातील सर्वच धरणांतून पिण्याचे आणि सिंचनाचे आवर्तन सुरू असतानाही टंचाई निर्माण झाल्याने झालेल्या पावसाच्या पाण्याचे जिल्ह्यात योग्य नियोजन झाले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

यंदा हवामान खात्यानेही पावसाचा लहरीपणा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सध्या असलेले पाणीही काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असून प्रशासनाने तसे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ पाणी आहे म्हणून त्याचा वारेमाप वापर करणे महागात पडू शकते. त्यामुळेच उपलब्ध पाणी आगामी जूनऐवजी जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेल असेच नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

धरणांत 42 टक्के साठा : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाण्याची मागणी व धरणांमधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये 42 टक्के साठा असून त्यात सिंचनाच्या आवर्तनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमध्येही ऑक्टोबरअखेर 92 टक्के इतका साठा शिल्लक होता.

याशिवाय समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले. तसेच गावोगावी राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील पाझर तलाव, सिमेंट बंधारे, शेततळ्यांमध्येही कमालीचे पाणी साचले. या साचलेल्या पाण्यातून शेतकर्‍यांनी खरीप व रब्बीचे पिके पिकवली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही अशी शक्यता व्यक्ती केली जात असताना प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटू लागले. विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.

विशेष करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम धरणांमध्ये 42 टक्केच पाणी शिल्लक असून या पाण्यावर आगामी चार महिन्यांची गरज भागवावी लागणार आहे. जिल्ह्यांचे आरक्षण वेगळे आहे.

LEAVE A REPLY

*