नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे ४ बळी ; दोन महिन्यांत १९ लोकांना स्वाईन फ्लूची लागण

0

 

नाशिक : दोन महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 19 रुग्ण आढळले असून त्यापैकी 4  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू रोखण्यासाठी महापालिका हद्दीतील कथडा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयात लवकरच अशा प्रकारचा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूचा एक रुग्ण जिल्ह्यात आढळला होता. तर फेब्रुवारीत 3 रुग्ण आढळले. त्यापैकी एक रुग्ण हा मनपा हद्दीतील पखाल रोड येथील होता. त्यावर उपचार करून त्याला सोडण्यात आले. तर अन्य दोन पैकी एक रुग्ण हा कोपरगाव येथील होता. तर दुसरा नामपूर सटाणा येथील होता. त्यातील नामपूरच्या मधुकर बारकू बच्छाव (52) यांचा 15 फेब्रुवारी रोजी सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान मार्च महिन्यात स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण आढळले असून त्यापैकी 12 रुग्ण हे महापालिका हद्दीबाहेरील आहेत तर 4 रुग्ण हे शहरातील आहेत.

त्यापैकी जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील कांचन रमेश हजारे या महिलेचा सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 6 मार्च रोजी मृत्यू झाला. तर सटाणा येथील सुरेखा विश्वासराव सोने या महिलेचा 10 मार्चला मृत्यू झाला. दरम्यान स्वाईन फ्लूची लागण झालेले रूग्ण हे पखाल रोड, सिडको, पिंपळगाव बहुला आदी भागातील आहेत.

बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा विषाणू बळावत असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे. त्या ठिकाणी स्वाईन फ्लू उपचारासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*