नाशिक जिल्ह्यातील तीन धरणातून 200 दलघफू पाण्याचा विसर्ग

0

नाशिक : ओझरखेड, पुणेगाव आणि वाघाड धरणांमधून आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यांमधील अनेक गावांची जुलैअखेरपर्यंतची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणीचोरी होणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गावांना ठरल्याप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडावे लागते. सोमवारी तीन धरणांमधून सुमारे 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास सुरुवात झाली. ओझरखेड धरणातून सर्वाधिक 160 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. पुणेगावमधून 35 तर वाघाडमधून 4 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाघाडमधून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा लाभ पाडेगाव, हातनोरे, निळवंडी आणि वलखेड या गावांना होणार आहे. पुणेगाव धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुणेगाव कालव्यावरील निफाड आणि चांदवड तालुक्यातील प्रासंगिक गावांना फायदेशीर ठरणार आहे. ओझरखेड धरणातून सर्वाधिक 160 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले असून महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. दिंडारी आणि निफाड तालुक्यातील प्रासंगिक गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. या तालुक्यांमधील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे हे एकच आर्वतन असून त्याचा लाभ जुलैअखेरपर्यंत मिळू शकणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*