नाशिकमध्ये 11 सिग्नलवर शिक्कामोर्तब ; कॉलेजरोडवर बाइकर्सला लागणार लगाम

0

नाशिक : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी व भरधाव वाहनांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नव्याने सिग्नल बसविण्यासाठी 20 ठिकाणे प्रस्तावित केली आहेत. त्यापैकी 11 ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये कॉलेजरोडवर 3 सिग्नल प्रस्तावित असून यामुळे धुमस्टाईल बाईक पळविणार्‍या बाईकर्सना लगाम लागणार आहे.

नव्याने बसविण्यात येणार्‍या सिग्नल यंत्रणामध्ये कॉलेजरोडवर कॅनडा कॉर्नर ते भोसला मिलिटरी स्कूलदरम्यान 3 ठिकाणी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने महापालिकेकडे पाठविला आहे. महापालिकेच्या वाहतूक नियोजन समितीवर हे प्रस्ताव सादर केले जाणार असून, उपयोगितेची चाचणी घेतल्यानंतर या सिग्नलबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे कॉलेजरोडवर धूम स्टाइल वाहने चालविणार्या बाइकर्सना आता आपोआप ब्रेक लागणार आहे.

मागील आठवड्यात प्रामुख्याने जेहान सर्कल परिसरात लागोपाठ दोन महिलांचे कारने धडक दिल्याने झालेल्या अपघात मृत्यू झाले. या कारणावरून संतत्प नागरीकांनी कॅण्डल मार्च काढत निषेध नोंदवला होता. शहरातील वाढते अपघात पाहता पोलीस प्रशासनाने. नव्याने 20 ठिकाणी सिग्नल यंत्रणा प्रस्तावित केली आहे. सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, स्थायी समितीच्या मंजुरीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

कॉलेजरोडवर बिग बझार, बीवायके महाविद्यालय चौक, हॉलमार्क चौक, पारिजातनगर या ठिकाणी सिग्नल बसविले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मनपाच्या वाहतूक नियोजन समितीवर सादर केला जाणार आहे. यापूर्वी एबीबी सर्कल, जेहान सर्कल, मायको सर्कल, महिंद्रा सर्कल, निलगिरी बाग, सारडा सर्कल, सिबल हॉटेल चौक, विद्या विकास सर्कल, सप्तरंग सर्कल याठिकाणी सिग्नलला मंजुरी दिली आहे. यात एबीबी व महिंद्रा सर्कल व आता जेहान सर्कलला प्राधान्याने सिग्नल बसवले जाणार आहेत. वाहतूक पोलिसांनी पाठविलेल्या पत्रात जत्रा हॉटेल, अमृतधाम चौक, औरंगाबादरोडवर सिग्नल प्रस्तावित केले आहेत.

कॉलेजरोड हा धूम स्टाइल बाइकर्सचा अड्डा झाला आहे. या रस्त्यावर कॅनडा कॉर्नर ते भोसला मिलिटरी स्कूलच्या गेटपर्यंत एकही सिग्नल नाही. या ठिकाणी महाविद्यालयीन युवक महागड्या बाइक्स सुसाट वेगाने चालवितात. त्यामुळे अनेक लहान-मोठ़या अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. सिंहस्थात झालेल्या चकचकीत रस्त्यांमुळे शहरातील अन्य भागांतील परिस्थितीदेखील कॉलेजरोडसारखीच आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी सिग्नल बसविण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे

LEAVE A REPLY

*