नाशिकमधून द्राक्ष निर्यातीत वाढ

0

नाशिक | दि. ९ प्रतिनिधी- गतवर्षाच्या तुलनेत याच कालावधीत सुमारे ४८ हजार मेट्रिक टन द्राक्ष नाशिकमधून विदेशात पाठवण्यात आले होते. मात्र यंदा द्राक्ष हंगाम सुमारे दोन महिने उशिरा सुरू होऊनही सुमारे ५० हजार १०० मेट्रिक टन द्राक्षांची नोंद निर्यातीसाठी झाली आहे. हंगामअखेरपर्यंत या आकडेवारीत मोठी भर पडणार आहे.

गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या दर्जावर विपरीत परिणाम झाला होता. त्याचबरोबर पाणीटंचाई आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना यात निर्यात होणार्‍या द्राक्षांच्या मण्यांना फटका बसून त्याची प्रत खालावली होती.

गेल्यावर्षी द्राक्ष काढणीचा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झाला होता. त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पाऊस झाल्याने खराब वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसला होता. कडाक्याच्या थंडीनेही द्राक्ष उत्पादकांचा प्रतिबंधक उपाययोजना करण्याचा खर्च वाढवला होता. त्यामुळे गेल्यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी कमी झाली होती.

यंदा द्राक्षाचा हंगाम थेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला आहे. यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता होती. मात्र छाटणीचे वेळापत्रक कोलमडल्याने द्राक्षांचा हंगाम पुढे ढकलला गेला आहे. यंदा द्राक्षाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे हंगामअखेर एक लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा आकडा ओलंडला जाईल, अशी शक्यता निर्यातदार वर्तुळातून वर्तवली जात आहे.

युरोपात द्राक्षांचे दर कोसळल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्षांच्या दरांना बसणार आहे. त्याचबरोबर चिलीमध्ये मागणी टिकून आहे. मात्र रशियातही दर घटले आहेत. देशातून सर्वाधिक द्राक्ष निर्यातीत नाशिकचा टक्का अधिक असतो आणि त्यांची बाजारपेठही रशिया आणि युरोपातील देश असतात. मात्र यंदा युरोपात दरात घट असल्याने नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्षांना त्याचा अपसूकच फटका बसणार, असे चित्र आहे.

नाशिकमध्ये सध्या दिंडोरी, निफाड, नाशिक या प्रमुख तालुक्यात द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. त्याचबरोबर चांदवड, देवळा या भागातही द्राक्षांचे क्षेत्र आहे. पण निर्यातीत नाशिकसह दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांचे प्रमाण अधिक असते. यंदा त्यात भर पडली आहे. कारण जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणे, गावठाण बंधारे आणि नदी-नाल्यांत संपूर्ण हिवाळ्यात पाणी होते. त्याचबरोबर सध्या कालव्यांना आवर्तन सुरू असल्याने त्याचा उपयोग द्राक्ष शेतीला होत आहे.

LEAVE A REPLY

*