नाशिकच्या बाजारात हापूस दाखल ; नीलम, केशर, बदामची आवक वाढली

0

नाशिक : आंब्यांसाठी नाशिककरांची प्रतीक्षा संपली असून फळांचा राजा असलेला हापूस शहरात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. सध्या 300 ते 400 रुपये किलो असा त्याचा भाव चढा आहे. पुढील महिन्यात हापूसचे भाव उतरतील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. हापूसबरोबरच गुजरातचा केशर, नीलम, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील बदांम जातीचे आंबेही बाजारात आले आहेत. तोतापुरीसाठी नाशिककरांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

फळांचा राजा आंबा सर्वांचीच पसंती! यंदा मार्च महिन्यात आंब्याची आवक सुरू झाली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच हापूस आंबा बाजारात दाखल झाला. सुरुवातीला केवळ महत्त्वाच्या चौकात दिसणारा हापूस तिसर्‍या आठवड्यात शहरात सर्वच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. सध्या त्याचा भाव तीनशे ते चारशे रुपये किलो इतका असल्याने त्याची मागणी मर्यादित आहे.

परंतु बदाम, केशर, लंगडा, नीलमंचे भाव 150 ते 200 रुपये किलो असल्याने सर्वसामान्यांकडून त्यांच्या खरेदीला जास्त पसंती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांत अांबे खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याचे नाशिकमधील फळविके्रत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंब्यांचा बाजार तेजीत असेल, असेही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या हापूसचा दर सर्वांत जास्त असला तरी अक्षय तृतीयेपर्यंत हा दर खाली येईल. त्यामुळे पुढील पंधरवड्यात नाशिककरांना हापूसची चव स्वस्तात चाखता येईल, अशी स्थिती आहे.

तर अन्य प्रजातींच्या आंब्यांचे दरही आवक वाढल्यानंतर घसरण्याची शक्यता आहे. हे दर 60 ते 80 रुपये किलो असतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. दरम्यान यंदा हवामान उत्तम राहिल्याने आंबा उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबा येण्याची चिन्हे आहेत. सध्या बाजारात कोकण, पुणे, गुजरात, मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात आंबा येतो. दर जास्त असल्याने तसेच आंबा नाशवंत असल्याने तो कमी प्रमाणात खरेदी केला जात आहे. परंतु पंधरवड्यात त्याची उलाढाल कोट्यवधी रुपयांत असेल, असेही काही व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

सध्या विविध राज्यांतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केटच्या काही भागात आंबा उतरवला जातो. सध्या केवळ एक-दोन ट्रक आंबा शहरात येत आहे. परंतु पुढच्या काळात दिवसाला दहा ते पंधरा ट्रक आंब्याची आवक होईल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. देवगड हापूसबरोबरच, रत्नागिरी, पुणे येथूनही हापूस आंबे बाजारात येणार आहेत. गुजरातमधून केसरची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. तूर्तास आंब्याचे भाव उतरण्यासाठी अजून थोडे दिवस नाशिककरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*