नाशिकच्या कृषी महाविद्यालयास अखेर मंजुरी

0

नाशिक । दि. 25 प्रतिनिधी
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने नाशिकमध्येही कृषी महाविद्यालय व्हावे अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केली होती.

अखेर ही मागणी मान्य करत जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सावतामाळीनगर येथे कृषी महाविद्यालय स्थापण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

नाशिककरांच्या मागणीस मंत्रिमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने खा. हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेउन त्यांचे आभार मानले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेच्या 90 व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ज्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध होईल व सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील अशा ठिकाणास कृषी महाविद्यालयाकरिता प्राधान्य देण्याचे ठरले.

त्यानुसार खा. गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील सावतामाळीनगर येथे हे महाविद्यालय व्हावे याकरीता पत्र दिले.

त्यानुसार सावतामाळीनगर येथे जवळपास 300 एकर क्षेत्रापैकी 100 एकर जागा ग्रामपंचायतीच्या परवानगीसह व ठरावासह प्रस्ताव मंत्रालयात कृषी विभागाकडे सादर करण्यात आला होता.

या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी 25 कोटीच्या खर्चास तत्वतः मान्यताही देण्यात आली.त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल खा. गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*