नाशिककरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका

जिल्हा प्रशासनाचे आवाहन ; आणखी दोन दिवस उष्माघात वाढणार हवामान खात्याचा अंदाज

0

नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून आज नाशिक शहरात 40.3 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर मालेगावचा पारा 43.2 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला.

हवामान खात्याने येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उष्माघातापासून बचावासाठी दूपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.

शहराच्या कमाल तपमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. हंगामातील सर्वाधिक कमाल तापमान आज 40.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. रविवारी 40.1 इतके तापमान नोंदविण्यात आले. त्यानंतर 40.3 इतका उच्चांक दहा वर्षांत प्रथमच मार्चमध्ये झाल्याचे हवामान खात्याकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडत असल्याचे दिसून येत आहे.

दहा वर्षात प्रथमच नाशिकच्या तापमानाने चाळीशी ओलांडल्याचे तज्ञ सांगतात. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून ही लाट पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता आपत्ती निवारण कक्षानेही नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्म्यामूळे उष्माघाताने मृत्यु होण्याचा धोकाही अधिक असल्याने नागरिकांना सकाळी 11 ते 5 यावेळेत कामाशिवाय बाहेर पडू नये असा सल्लाही आपत्ती निवारण कक्षाने दिला आहे.

मंगळवारी (दि.28) तपमानाचा पारा 40.3 अंशावरच स्थिरावला. आठवडाभरापासून शहराच्या तपमानाचा पारा वाढता वाढता चाळीशीच्या पुढे गेल्यामुळे नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडल्याने 40.3 इतका उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. हवामान खात्याने बुधवारी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

उष्माघात होण्याची कारणे
उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्यामध्ये बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीत सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताची लक्षणे
थकवा येणे, ताप येणे व त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता बेशुद्धावस्था इत्यादी़

उपचार
रुग्णांस हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कूलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे, रुग्णांचे तापमान कमी करण्याचे प्रयत्न करावेत, रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइसपॅक लावावेत.

LEAVE A REPLY

*