Type to search

नाशिककरांचा अभिनंदनीय प्रतिसाद

अग्रलेख संपादकीय

नाशिककरांचा अभिनंदनीय प्रतिसाद

Share
दुचाकीवर भरधाव रपेट मारायला सर्वांनाच आवडते. तरुणाई त्यात सर्वात पुढे असते. मात्र वेगाचे हेच वेड कधी-कधी जिवावरही बेतू शकते याची जाणीव का ठेवली जात नाही? नाशकात दररोज कुठे ना कुठे दुचाकीचा अपघात होऊन एखादा तरुण जखमी झाल्याच्या वा मृत्युमुखी पडल्याच्या घटना रोजच घडत असतात. अपघाताचे बळी ठरणार्‍या अशा बहुतेक घटनांत हेल्मेट वापरण्याचा आळस हे प्रमुख कारण ठरल्याचे वारंवार आढळून आले आहे.

म्हणूनच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने नाशिक पोलिसांनी परवापासून नाशिकमध्ये ‘हेल्मेट ड्राईव्ह’ सुरू केला आहे. दोन हजार पोलीस त्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. या मोहिमेची कल्पना आठवडाभर आधीच पोलिसांनी शहरवासियांना दिली. पहिल्या दिवशी हजारावर दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई झाली. सकाळच्या सत्रात चांगला परिणाम दिसला. दुपारनंतर मात्र अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेटला ‘बाय-बाय’ केल्याचेही पाहावयास मिळाले. तथापि बहुसंख्य नाशिककरांनी ‘हेल्मेटसक्ती’चे स्वागतच केले आहे.

रोटरी क्लब आणि पोलिसांनी जुना गंगापूर नाका येथे जनजागृती अभियान राबवले. शेकडो दुचाकीस्वारांनी ‘हेल्मेटसक्ती नव्हे जबाबदारी’ असे सुचवत वाहतूक नियम पाळण्याची शपथ घेतली. हेल्मेटसक्ती मोहीम नाशकात तशी नवी नाही. त्यामुळे काहींनी कारवाईच्या भीतीपोटी तर बहुतेकांनी सुरक्षेच्या उद्देशाने हेल्मेटला पसंती दिली आहे. हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमधून ग्राहकांची झुंबड उडत आहे. तरुणाई मात्र हेल्मेटबाबत पुरेशी जागरुक का नसावी? हेल्मेटसक्तीची मोहीम अजून दोन-तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे हेल्मेट वापराशिवाय दुचाकीस्वारांपुढे पर्याय नाही. सक्तीमुळे का होईना; नाशकात दुचाकीस्वारांच्या डोक्यावर हेल्मेटला स्थान मिळत आहे.

ते पोलिसांच्या या मोहिमेचे यश आहे. एखाद्या दुचाकी अपघातात जवळचा मित्र वा नात्यातील तरुण दगावतो. ‘त्याने हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता’ असे उद्गार त्यावेळी अनेकांच्या तोंडून बाहेर पडतात. हेल्मेटसक्ती मोहीम लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, किंबहुना दुचाकीस्वारांच्या भल्यासाठीच आहे. नाशिककरांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळेच या मोहिमेला आता मिळालेला प्रतिसाद पुढील काळातही टिकून राहील अशी आशा करता येते. पुणेकरांनी हेल्मेटसक्ती मोहिमेला कडाडून विरोध करून शहाणपणाचा ‘पुणेरीबाणा’ दाखवण्याचा विडा उचलला आहे. पुणेकरांच्या त्या शहाणपणाचे अनुकरण नाशिककरांना करावेसे वाटत नाही याबद्दल त्यांचेही अभिनंदन!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!