नाले.. गाव! 150 घरांत तळे, रात्र पाण्यात!

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– शनिवारी रात्री सुरू झालेला जलाभिषेक रविवारी सायंकाळपर्यंत सुरु होता. तब्बल 20 तास झालेल्या पावसाने नगरकरांची दैना उडविली. गटारगंगा बनलेली केविलवाणी सीनानदी रौद्रावतार धारण करुन काठावरील घरात शिरली. परिणामी निम्मे नालेगाव पाण्यात गेले. शहरात अन् उपनगरांत निचर्‍याची व्यवस्था नसल्याने सर्व रस्ते नाल्यासारखे दुथडी वाहू लागले. त्यामुळे अवघ्या नगराचे नाले गाव.. बनले. पाणी घरात गेल्याने अनेकांना रात्र जागवून काढावी लागली. काहींनी मोटारी लावून पाणी बाहेर काढले. मात्र तब्बल दीडशे घरे सोमवारपर्यंत पाण्यात होती. सखल भागातील अपार्टमेंट खालून उफाळल्या, झाडे उन्मळली, वीज गेल्याने नागरिकांची हालत खस्ता झाली.

शनिवार रात्री सुरू झालेल्या रिमझिप पावसाने रविवार सकाळी जोर धरला. रविवारी सकाळी सुरू झालेला पाऊस सलगपणे 8 तास कोसळत होता. जोरदार पावसाने नगर शहर तसेच उपनगरात चोहीकडे पाणीच पाणी झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. शहर व उपनगरातील जवळपास दीडशे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. नाल्यांभोवती असलेली अतिक्रमणे तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यानेे नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने त्या परिसरात असणार्‍या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले होते.
पोलिस मुख्यालय, -सिद्धीबाग, दिल्लीगेट, वारूळाचा मारुती प्रवेशद्वाराभोवती गुडघाभर पाणी वाहत होते. रस्त्यांनाही नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिल्लीगेट, नालेगाव परिसरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक विस्कळित झाली होती. दिल्लीगेट परिसरातील डी. एड. कॉलेज शेजारील घरांमध्ये पाणी शिरले. अग्निशमन विभागाने ड्रेनेजवर टाकण्यात आलेली झाकणे बाजूला करून पावसाच्या साचलेल्या पाण्याला वाट करून दिली. दल्लीगेट परिसर, डी.एड. कॉलेज शेजारी, खोकर नाला, गणेश चौक (बोल्हेगाव), रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आनंदनगर, सारसनगर परिसरातील रवीश कॉलनी, बुरूडगाव रस्त्यावरील जीवनदीप कॉलनी, नवलेनगर, गुलमोहर रस्त्यावरील कमल-माधव आपर्टमेंट, सावेडीतील कैलास कॉलनी, प्रभात कॉलनी, बागरोजा हडको आणि नालेगाव परिसरातील सुमारे दीडशे ते दोनशे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
चितळे रस्ता, वाडियापार्क मैदानाभोवती असणार्‍या तळघरातील व्यावसायिक गाळ्यांमध्ये रस्त्याने वाहणारे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे हाल झाले. दुकानातील साहित्य पाण्यापासून वाचविण्याची धावपळ सुरू होती. विजेची मोटार लावून काही गाळेधारकांनी पाणी उपसून रस्त्यावर सोडून दिले.

महावीरनगर, साठे वसाहत, बागरोजा हडको, नालेगाव पाण्याखाली
सावेडीतील महावीनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, नालेगाव आणि बागरोजा हडको ही पूर्णत: पावसाच्या पाण्याखाली गेली. तेथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची कोणतीच तजवीज महापालिकेकडे नव्हती. आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच झाले. महापालिकेचे व्यवस्थापनच पाण्याखाली गेल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक दीप चव्हाण यांनी केला.

सुरक्षेची साधनेच नाहीत
एखादा भाग, उपनगर, कॉलनी पाण्यामुळे बाधीत होत असल्यास तेथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे ही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. बागरोजा हाडको, अण्णाभाऊ साठे चौकातील झोपडपट्टी पूर्णत: पाण्याखाली होती. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहण्यासाठी लागणारी सामग्रीच महापालिकेकडे नव्हती. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रुग्णवाहिका रस्त्यावर कोठे दृष्टीस पडली नाही. महापालिकेचे चार-दोन अधिकारी सोडले तर कोणीच शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी रस्त्यावर फिरकले नाहीत.

वीज गायब
पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे अनेक भागातील रोहित्रे बंद झाली. रविवारी दुपारनंतर गायब झालेली वीज सोमवारी सकाळी प्रकटली. रविवारची रात्र मुकुंदनगर, भिंगारकरांनी विना वीजेची काढली. रविवारी रात्री शहरातील मध्यभागात वीज पुरवठा सुरू झाला.

पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पाण्यात
महापालिकेची आपत्ती व्यवस्थापना यंत्रणा फक्त कागदोपत्रीच असल्याचे रविवारी दिसून आले. हवामान विभागाने जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही महापलिकेचे आयुक्त, दोन उपायुक्त रविवारी शहरात नव्हते. इतकेच काय यंत्रणेतील प्रमुख घटक असलेले प्रभाग अधिकारीही जागेवर नव्हते. त्यांचे मोबाईलही स्वीच ऑफ होते. ज्येष्ठ नगरसेवक दीप चव्हाण यांनी आयुक्त मंगळे यांच्याशी फोनवर संपर्क करून पावसाच्या पाण्याची परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी विभागप्रमुखांना फोन करत यंत्रणा कार्यन्वीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत शहर पाण्याखाली गेले होते.

LEAVE A REPLY

*