नालेसफाईबाबत साशंकता

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-मान्सूनपूर्व शहरातील छोटे-मोठे सर्व नाले साफसफाई करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार 3 जेसीबीच्या माध्यमातून नाले सफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान चारही प्रभाग अधिकार्‍यांनी नालेसफाई झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र पहिल्याच पावसात नालेसफाईचा बोजवारा उडाल्यामुळे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी अधिकार्‍यांची समिती गठीत केली असून दि.14 जून पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

शिवाजीनगर, गोपाळपुरा, एकनाथनगर, इच्छादेवी चौक, पिंप्राळा या परिसरामध्ये अक्षरश: नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

तसेच छोटे-छोटे नाले देखील ओसंडून वाहत होते. त्यामुळे नालेसफाईबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. शहरातील 23 किमी लांबीचे पाच मोठे नाले आणि 20 छोटे नाले आहेत.

सर्व नाल्याची सफाई झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे चारही प्रभाग अधिकार्‍यांनी पाहणी करुन पाचही मोठे नाल्यांची सफाई केल्याबाबतचा अहवाल प्रभाग अधिकार्‍यांनी आयुक्तांना दिला आहे.

परंतु पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण झाली असून नाल्यातील पाणी अक्षरश: नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे आयुक्तांनी नालेसफाईची पाहणी करण्यासाठी पुन्हा समिती गठीत केली असून त्याचा अहवाल दि.14 पर्यंत सादर करण्याचे आदेश देखील दिले आहे.

या समितीत प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, पा.पु.अभियंता, डी.एस.खडके, विद्युत अभियंता, एस.एस.पाटील, लक्ष्मण सपकाळे, सुनिल गोराणे, चंद्रकांत पंधारे, अनिल बिर्‍हाडे यांचा समावेश आहे.

शहरात आयुक्त जीवन सोनवणे यांनी सकाळी पाहणी केली तसेच ज्या भागांमध्ये पाणी साचते त्या भागांची यादी तयार करुन उपाययोजना करण्याची सुचना दिली आहे.

दरम्यान, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील नालेसफाईबाबत आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

*