नामदार-आमदार आमने-सामने

0

नववर्ष आगमनाला दोन दिवस बाकी असताना नाशिक जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परवा पार पडली. बैठकीला समिती सदस्यांसह जिल्ह्यातील आमदार, जि. प. अध्यक्ष व प्रशासकीय अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी हजर होते. या बैठकीत बहुतेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील रस्ते, पाणी, गटारी अशा गावपातळीवरील प्रश्‍नांची सरबत्ती केली.

त्यांचा रोख बहुधा अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणावर असावा. आर्थिक नियोजनाचा विषय सोडून आमदारांनी तक्रारींचा पाढा वाचल्याने पालकमंत्री संतापले. डीपीडीसी बैठकीनिमित्त नामदार-आमदार यांच्यातील ‘सामना’ चांगलाच रंगतदार ठरला. एरवी एखाद्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा दौरे करणार्‍या मंत्र्यांनासुद्धा कार्यकर्त्यांकडून होणारा अशा प्रश्‍नांचा मारा सोसावा लागतो. महाजन यांनीही असा अनुभव यापूर्वी नक्कीच घेतला असेल. ‘ही ग्रामसभा नाही. नियोजन समितीची बैठक आहे’ असे आमदारांना बजावण्याची वेळ महाजनांवर पुन्हा आली. ‘हल्ली ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात.

ही कामे मार्गी लावण्याचा अधिकार आमदारांना उरलेला नाही; पण लोकप्रतिनिधी म्हणून लोक आमदारांकडेच त्याबाबत मागणी करतात. म्हणून अशा अनियोजित रस्त्यांसाठी डीपीडीसीत तरतूद करावी’ ही आमदारांची मागणी अगदीच चुकीची होती का? जिल्ह्यातील सर्वच आमदार नवखे आहेत असे नाही. तरीही सर्व आमदार आणि सदस्यांसाठी डीपीडीसीच्या कामकाजाबाबत एक दिवसाचा प्रशिक्षणवर्ग घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना का केली असेल? पालकमंत्र्यांनी समज देऊनही आमदारांचे तक्रारींचे पाढेवाचन सुरूच राहिले.

‘आमदारच अशा पद्धतीने समस्या मांडणार असतील तर सदस्यांनी काय बोध घ्यावा?’ असा त्रस्त सवालही महाजन यांनी केला. आमदार मंडळी पोटतिडकीने प्रश्‍न मांडत होती. ते पाहता ग्रामीण प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शवली असती तर ते उचित ठरले नसते का? मंत्री म्हणून आपण सर्वज्ञ असल्याचा अविर्भाव आणून पालकमंत्र्यांनी पाजलेले उपदेशाचे डोस आमदारांना कसे रुचले असतील? कोणत्या सभेत काय विचारावे वा मांडावे हे न कळण्याइतके आमदार खरोखरच दुधखुळे असतील का? मंत्रिपदाचा तोरा यानिमित्त महाजनांनी मिरवून घेतला, असा जिल्ह्यातील आमदारांचा समज झाला असल्यास तो अनाठायी म्हणता येईल का?

LEAVE A REPLY

*