‘नाजूक’ कारणामुळे महिलेचा बळी

0

कानोेेेलीतील एका विरोधात गुन्हा

देवगाव (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील एका महिलेने ‘नाजूक’ कारणावरुन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. संबंधित महिला गंभीर जखमी झाल्यानंतर तिच्यावर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत विवाहित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुक्यातील कनोली येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील कोळवाडजे येथील महिलेची कनोली येथील पंढरीनाथ अशोक ऊर्फ नारायण वर्पे याच्याबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचा पंढरीनाथ वर्पे याने फायदा घेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंढरीनाथ वर्पे हा 29 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी त्या महिलेच्या घरी गेला. तेथे त्याने संबंधित महिलेस शिवीगाळ केली. हा वाद ‘नाजूक’ कारणावरुन झाला होता.

पंढरीनाथ वर्पे याच्या त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली. संबंधित महिलेला महिलेस त्याच रात्री संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून तिला नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असतांना सोमवार दि. 8 मे रोजी तिचा मृत्यू झाला.
दरम्यान तिचा मृतदेह कोळवाडे येथे आणण्यात आला. मात्र या प्रकरणातील आरोपीला अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोरुन हलविणार नाही, असा पावित्र मयताच्या नातेवाईकांनी घेतला. दरम्यान संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी नातेवाईकांना आरोपीला तात्काळ अटक करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्या महिलेच्या मृतदेेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत संबंधित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंढरीनाथ नारायण वर्पे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा भारतीय दंड संहिता 306, 506, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3 (2) (5) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे करत आहे.

संबंधित महिलेच्या पश्‍चात पती, तीन मुली असा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत असताना परिस्थितीचा फायदा घेत महिलेवर अन्याय करणार्‍या पंढरीनाथ वर्पे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी रामनाथ शेकाळे, कैलास लहांगे, महादू गोंदे, लालू कडू, मंगेश कडू, सुरेश काळे, अशोक कडू यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*