नागपूरच्या धर्तीवर ‘फायर अलर्ट हॉट लाईन’चा प्रस्ताव

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर सुरक्षितेतच्या दृष्टीने उपाययोजना

0
नाशिक | दि.१२ प्रतिनिधी- शहरात कोणत्याही भागात आग लागल्यानंतर त्यांची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षापर्यंत येण्यास अनेक कारणातून होणारा विलंबामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. हा विलंब टाळण्यासाठी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी नागपूर शहराच्या धर्तीवर फायर अलर्ट हॉट लाईन ही सुरक्षितता यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील उंच इमारती, रुग्णालये, मॉल, मल्टी फ्लेक्स आदी आस्थापनांमध्ये फायर हाय अलर्ट सिक्युरिटी सिस्टीम लागू करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २८५ नुसार आग अपघात प्रसंगी अत्यंत तातडीने बचाव कार्य व मदत कार्य करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकांतील अग्निशमन दलाची आहे. आत्तापर्यंत दूरध्वनी, भ्रमणध्वनी, व्यक्तीश: अग्निशमन दलात येऊन खबर देणे, पोलीस नियंत्रण कक्षातून आणि जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातून आगीसंदर्भात माहिती दिली जात आहे.

या माध्यमातून आगीची माहिती मिळताना काही त्रुटी व इतर कारणांमुळे माहिती मिळण्यास विलंब होऊ शकतो. संवेदनशील इमारती (ज्याप्रमाणे उंच इमारती, रुग्णालये, मॉल, मल्टीप्लेक्स व अन्य उंच इमारती) यातील आगीबाबत माहिती अग्निशमन विभागाला मिळणेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिसाद कालावधी कमीत कमी (किमान) करता येणे शक्य आहे. यासाठी लागणे अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजेचे आहे.

सध्या प्राथमिक स्वरुपाची आग शोधक व आग सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित असून यासमवेत जीपीएसवर आधारित यंत्रणा बसवल्यास संदेश, दळणवळणाचे काम झपाट्याने होऊ शकते. याकरिता असलेली फायर अलर्ट हॉट लाईन ही यंत्रणा नागपूर महापालिकेने बसविलेली असून आता ठाणे महापालिकेत ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. आगीची सूचना तात्काळ मिळाल्यानंतर तात्काळ प्रतिसाद दिल्यास जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नाशिक शहरातील उंच इमारती, रुग्णालये, मॉल, मल्टी फ्लेक्स आदी आस्थापनांमध्ये फायर हाय अलर्ट सिक्युरिटी सिस्टीम लागू करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

मनपाला मिळणार उत्पन्न
ही यंत्रणा उंच इमारती, रुग्णालये, मॉल, मल्टी फ्लेक्स आदी आस्थापनांमध्ये वापरली जाणार असून निवीदाकार संस्थेला जेव्हढे उपभोक्ता मिळणार आहे, त्यातील निवीदाकार जी मान्य करतील ती टक्केवारी (किमान १०%) महापालिकेला मिळणार आहे. अशाप्रकारे कोणताही भांडवली व महसुली खर्चाचा भार महापालिकेवर राहणार नाही. तसेच यामुळे अग्निशमन विभागाकडून तात्काळ मदत मिळून संभाव्य नुकसान टाळण्यात यश मिळणार आहे.

अशी आहे यंत्रणा
फायर अलर्ट हॉट लाईन ही यंत्रणा इमारतीमधील स्मोक / हिट डिटेक्टरच्या पॅनलशी जोडली जाते. त्या युनिटचा संपर्क अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात ठेवण्यात आलेल्या सर्व्हरशी जोडलेला असतो. सर्व्हरशी जोडलेल्या स्क्रिनवर तातडीने आगीची घटना विभाग, क्षेत्र, इमारत आदीसह माहिती दिसते. तसेच आवश्यकतेनुसार या सिस्टीमध्ये मार्गदर्शकची व्यवस्था करता येऊ शकते. अशाप्रकारे या यंत्रणेद्वारे अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करता येऊन जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते.

LEAVE A REPLY

*