Type to search

आरोग्यदूत

नाक मे उंगली, कान मे तिनका

Share

कुठल्याही प्रवचन, कीर्तनामध्ये कायम एक पालुपद असते तुका म्हणे… संत साहित्याचा अभ्यास असणार्‍या व्याख्यात्यांच्या भाषणामध्येसुद्धा कायम संदर्भ असतात. तुका म्हणे…. हल्ली वैद्यक जगतात, आजाराच्या क्षेत्रात अ‍ॅलर्जिक या शब्दाची फार चलती आहे. जसं की अ‍ॅलर्जिक अस्थमा, अ‍ॅलर्जिक त्वचा विकार तसेच अ‍ॅलर्जिक सर्दी. अख्खं जग ओरडू देत अ‍ॅलर्जिक, अ‍ॅलर्जिक परंतु आमचा द्वितीय पुरुषी एक वचनी प्रश्न आहे.

तू का म्हणे अ‍ॅलर्जिक सर्दी?
मानेवर पट्टा, नाकावर प्लॅस्टिक मास्क ह्या हल्ली औद्योगिक महानगरांच्या प्राथमिक गरजा ठरताहेत. त्यांना टिकेचा मुद्दा बनविण्यात अर्थ नाही. त्याला पर्याय उपलब्ध करून देणे महत्त्वाचे. अ‍ॅलर्जिक सर्दी म्हणजे अ‍ॅलर्जी कसली तर धूळ, धुराची! असं केवळ आधुनिक शास्त्राचं नव्हे तर आयुर्वेदाचं सुद्धा म्हणणं आहे. परंतु त्या काळी समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी अ‍ॅलर्जी शब्दाचा वापर होत नसे. कारण त्यावेळी वापरात नसे नस्य. घरातून बाहेर पडण्यापूर्वी नस्य अर्थात् नाकात तेल घालून निघाल्यास धूळ, धूर या अ‍ॅलर्जींची बाधा होत नाही असं आयुर्वेदाचं प्रतिपादन. मी स्वत: आणि रुग्णांना असं करतांना बघितलं. घरातून निघाल्यानंतर ईप्सित स्थळी पोहोचताच नाक शिंकरले असता मातकट असं काही पडल्याची कायम नोंद केली. याचा अर्थ कालपर्यंत ही धूळ नाकात जात होती, आत्ताशा मात्र तेलालाच चिकटून रहात असे. याच अनुषंगाने आपण नस्य करण्याची पद्धती समजून घेऊ यात.

नाकाद्वारे औषध टाकणे या क्रियेला नस्य म्हणतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य हे पंचकर्म होत. नस्य वगळता इतरांबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतली आहेच. नाकाद्वारे चूर्ण, पानांचा रस तसेच तेल व तूप आदि गोष्टी नाकामध्ये टाकल्या जातात. परंतु आरोग्यासाठी, नियमित वापरासाठी मात्र तेलाचा वापर होतो. मानेवरील सर्व अवयव व आजारासाठी नस्य हा पहिला उपाय होय. आरोग्यासाठी पंचकर्म करताना त्यांचा ऋतू ठरलेला म्हणजे वर्षातून एकदाच परंतु नस्याबाबत मात्र ती सूट नाही. नाकामध्ये तेल नियमित टाकायला हवे. परंतु जेव्हा कुणी पहिल्यांदा टाकायला सुरूवात करतात तर त्यांची उलट तक्रार असते की तेव्हापासून सर्दी सुरू झाली. त्यासाठी अगोदरच्या दोषांचा उपसा झाला म्हणजे नियमितच्या नस्याने दोष चिघळत नाही. अर्थात वर्षभरातून किमान एकदा सात दिवसांचा नस्याचा कोर्स करून घ्यावा. तोच हा नस्य विधी होय.

हिवाळ्याचे चार महिने वा उन्हाळ्याचे दोन महिने त्यासाठी निवडल्यास उत्तम, उन्हाळ्यात नस्य करायचे झाल्यास सकाळी 8 ची वेळ उत्तम. हा कोर्स सतत 7 दिवस, त्यामुळे या दरम्यान तुम्ही बाहेरगावी जाता कामा नये. सकाळी उठून काही न खाता, चक्क चहापाणी सुद्धा न घेता. आंघोळ तर मुळीच नको. म्हणजे काय तर सकाळी उठून शौच, मुखमार्जन करून दवाखान्यात जायचे असे वागणे अगत्याचे आहे. नसता तुम्ही चुकून पाणी प्यायलात, आंघोळ केलीत आणि नस्य घेतलं तर काही वेळा शिंका, सर्दी, डोके जड या अनेक तक्रारींनी पळता भुई कमी होणार. तेव्हा ह्या सूचना अवश्य पाळा. रास्नादि चूर्ण हे औषधी एरंड तेलात किंचित कोमट करून टाळूवर ठेवले जाते त्याला तळम् म्हणतात. त्यानंतर औषधी तेल वा कोमट तीळ तेलाने संपूर्ण चेहरा, कान, मान, खांदा यांची विशिष्ट पद्धतीने मालिश करतात. रुमालाची घडी करून त्याची पट्टी डोळ्यावर बांधून संपूर्ण चेहर्‍याला, मान, खांद्यापर्यंत वाफ दिली जाते. डोळ्याला उष्ण स्पर्श नको असतो., त्याला जपावं म्हणून डोळ्यावर पट्टी, वाफेनंतर पट्टी सोडली जाते. टेबलवर झोपवून मान टेबलाखाली झुकेल अशा तर्‍हेने ठेवून वा खांद्याखाली उशी ठेवून नस्य दिले जाते. कोमट औषधी तेल गोकर्ण या खास यंत्राने दोन्ही नाकामध्ये टाकले जाते. त्याची मात्रा 4-4 थेंबापासून 8-8 थेंबांपर्यंत हळूहळू रोज वाढवली जाते. यानंतर पुन्हा एकदा चेहरा, कान, मान, खांदा तसेच तळहात, तळपायाला तेल चोळले जाते. (पूवार्ध)
वैद्य सौ. अर्चना तोंडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!