‘नमो उद्याना’ऐवजी ‘सावरकर पार्क’

0
नवीन नाशिक | दि. २४ प्रतिनिधी- महापालिकेच्या बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेवर ‘नमो उद्यान’ उभारण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना शिवसेनेकडूनच खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार स्पष्ट झाला असून शिवसेनेकडून पेलिकन पार्कला नमो उद्यानाऐवजी ‘सावरकर पार्क’ असे नाव देण्याची मागणी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे करण्यात आली आहे.
दोन दशकांहून अधिक काळ विनावापर पडून असलेल्या १७ एकरच्या पेलिकन पार्कची समस्या सोडवण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, आमदार, नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र न्यायप्रविष्ठतेमुळे लोंबकळलेला हा प्रश्‍न आ. सीमा हिरे यांच्या माध्यमातून नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. त्यासाठी आमदार निधी व राज्य शासनाच्या निधीला मंजुरी घेऊन त्या जागेवर बहुउद्देशीय नमो उद्यानाची निर्मिती करण्याचा संकल्प जाहीर केला.

 
भाजप-सेनेतील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने कळस गाठला असतानाच नमो उद्यानाच्या भाजपच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी सेनेकडून सावरकरांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात स्वा. सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अलौकिक आहे.

त्यांच्या नावाने राजकारण करणारा भाजप सावकरांना भारतरत्न देऊ शकत नसेल तर कमीत कमी त्यांचे नाव उद्यानाला देण्याचा मोठेपणा दाखवावा, अशी भावना नाशिककरांची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर नवीन नाशिक शिवसेनेचे रवी पाटील, अभय दिघे, संतोष बच्छाव, सचिन धांडगे, पृथ्वीराज अंडे, नितीन परदेशी, समाधान बोडके, विशाल इले, दीपक थोरात, सागर वाघ, आशिष रणशौर्य, संतोष बच्छाव, इम्रान शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ते शिवसैनिक नाहीत
पेलिकन पार्कच्या नामकरणाबाबत निवेदन देणारे कार्यकर्ते हे नवीन नाशिकमधील नसल्याचा व त्यांचा नवीन नाशिक शिवसेनेशी सुतराम संबंध नसल्याचा दावा शिवसेनेचे विधानसभा समन्वयक सचिन राणे यांनी केला आहे. निवेदन देताना ज्यांचा फोटो व नावे प्रसिद्ध झाली आहेत त्यांना आम्ही ओळखत नसून ते शिवसेना, भाविसे किंवा युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी नाहीत. नवीन नाशिक शिवसेनेने निवेदन दिले आणि त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याने आम्हीच आचंबित झालो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना हा पक्षशिस्त पाळणारा पक्ष आहे. महापालिकेशी संबंधित प्रश्‍नावर संघर्ष करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सक्षम असताना स्थानिक पदाधिकार्‍यांपर्यंत निवेदन देण्याची वेळ येत नाही. मुळात पेलिकन पार्कचा प्रश्‍न हा न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. ज्यावेळी न्यायालयाचा निर्णय लागेल त्यावेळी पक्ष योग्य ती भूमिका घेईल.
– रत्नमाला राणे (नगरसेविका, प्रभाग २९)

गेली अनेक वर्षे राजकारण करीत आहे. मात्र ज्यांची नावे निवेदनावर आहेत ते शिवसैनिक आहेत का, याविषयी शंका आहे. ज्यांची नावे आहेत ते नाशिकचे रहिवासी नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तरीही गेली अनेक वर्षे खितपत पडलेला प्रश्‍न निकाली निघत असताना जनसामान्यांच्या हिताचा विचार करून शिवसेनेने विरोधासाठी राजकारण करू नये. नामकरणाचा प्रश्‍न अजून खूप लांब आहे. आधी विकासकाम मार्गी लागणे गरजेचे आहे.
– मुकेश शहाणे (नगरसेवक प्रभाग २९)

LEAVE A REPLY

*