नगर टाइम्स कट्टा : 15 हजार क्रीडा, कला, संगीत शिक्षक हद्दपार होतील!

0

शासनाने राज्यात कला, क्रीडा, संगीत शिक्षकांच्या तब्बल 50 टक्के तासिका कमी केल्या आहेत. परिणामी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 14 ते 15 हजार शिक्षक अतिरिक्त ठरतील. याला पर्याय म्हणून अतिथी शिक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या अतिथी शिक्षकाला रोजंदारीपेक्षा कमी मानधन आहे. मग तो कसा काम करील, त्यामुळे क्रीडा क्षेत्र आणखी काळवंडून जाणार आहे. असे जर धोरण ठेवले तर ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे घडतील. कला शिक्षकांना भिकेला लावून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणखी अधोरेखित होईल का? या लढ्यासाठी शारीरिक शिक्षण, कला, संगीत विषय बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचे राज्याचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्याशी नगर टाईम्सने संवाद साधला. त्याचा लेखाजोखा..

कला-क्रीडा शिक्षकांचा नेमका प्रश्न काय आहे?
– नववी पुनर्रचित अभ्यासक्रम/विषय योजना व तासिका नियोजनाचे पत्रान्वये कला-क्रीडा विषयाच्या तासिका 50% ने कमी केल्याने शिक्षकावर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे.
या गोष्टीचा काय परिणाम होईल?
– पूर्वी वेळापत्रक 50 तासिकेंचे होते. पण सन 2017-18 चे तासिका वाटपाचे पत्रक जारी करून वेळापत्रक 45तासिकेंचे केले.या मध्ये कला-क्रीडाचा भारांश 50% व कार्यानुभवाचा 25%भारांश कमी झाल्याने कला-क्रीडा शिक्षकांचा कार्यभार बसणार नसल्याने संच मान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
या निर्णयामुळे शिक्षक घरी जातील?
– महाराष्ट्रात 14 ते 15 हजार कला-क्रीडा शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. तसेच संख्येने मोठ्या शाळा वगळता अन्यत्र कला-क्रीडा शिक्षक भरले जाणार नाहीत.शिक्षकाची जागा अतिथी (निदेशक) शिक्षक घेईल.
अतिथी निदेशक ही काय संकल्पना आहे?
– अतिथी निदेशक म्हणजे अतिथी शिक्षक. या पुढे शारीरिक शिक्षण शिक्षक हे पद न भरता त्याच्या जागीरोजंदारीपेक्षाही कमी मानधनावर हा शिक्षक नेमला जाणार आहे. त्याची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
अतिथी निदेशकास विरोध का?
-अतिथी निदेशक हा पाहुणा शिक्षक आहे. याला कधीही कामावरून कमी करता येईल अशी तरतुद आहे . क्रीडा शिक्षक हा सेवेत कायमस्वरुपी पदावर असल्याने त्याच्या भरवशावर व विश्वासावर पालक खेळाडूंना पाठवतात. अतिथी शिक्षक कायम स्वरूपी शिक्षक नसल्याने त्याच्या भरवशावर क्रीडा स्पर्धेस मुलींना ने – आण करणे, तसेच शाळेवेळेव्यतिरीक्त सरावासाठी मुलींना पालक पाठवू शकणार नाहीत. रोजंदारीपेक्षाही कमी मानधन मिळणार असल्याने हा शिक्षक मन लावून काम करू शकत नाही.
तासिका कमी केल्याचा दूरगामी परिणाम काय होईल?
– महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा शासनाचा हा एक कुटील डाव आहे. कलाव शारीरिकशिक्षण विषयाच्या तासिका कमी करून वेळापत्रकात पहिली तासिका 40 मिनिटांची व बाकी तासिका 30 ऐवजी 35 मिनीटांच्या करण्यात आल्याने अध्यापनाचा कालावधी कमी झाला नाही. पण कला क्रीडा शिक्षकावर संक्रांत मात्र आली.विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते.
शासन शिक्षणावर घाला घालते आहे?
– शासनाने शाळांची वेतनोत्तर अनुदाने बंद केली. अनेक वर्षांपासून नोकर भरतीवर गदा आणली. प्रथमतः शिपाई, प्रयोगशाळा परिचारक, क्लार्क,ही पदे उडवून भरतीवर बंधने घातली. त्यानंतर सुपरवायझर, मुख्याध्यापक या पदावर संक्रांत आणली. ठढए नुसार तीन भाषेला एकच शिक्षक ठेवला. शारीरिक शिक्षण व कला या विषय शिक्षकांना माध्यमिक मधून उच्च प्राथमिक (पदवीधर)मध्ये वर्ग केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. आता कला क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने महाराष्ट्रात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
शिक्षण विभाग व क्रीडा विभागात अवमेळ आहे का?
– शासनाने क्रीडा धोरण- 2012 स्वीकारून त्या तरतुदी लागू केल्या आहेत.शिक्षण विभागाने शासनाच्या क्रीडाधोरणाचा अभ्यास न करता तासिका वाढविण्याऐवजी, आहे. त्या तासिकेतून 50% भारांश कमी करण्यात आला. ग्रेस गुण का द्यावेत हे क्रीडा धोरणात स्पष्ट उल्लेख आहे.
परिपत्रकानंतर संघटनेने कोणती भूमिका घेतली?
– तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पुणे येथे शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालकांना तसेच क्रीडा आयुक्त व संचालकांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले. 20 मे रोजी विशेष अधिवेशन काळात मा. नाम. विनोदजी तावडे, विरोधी पक्षनेते मा नाम राधाकृष्ण विखे पा व धनंजय मुंडे यांना व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यापुढे बाजू मांडली.

LEAVE A REPLY

*