नगर जिल्ह्यासाठी दारणातून आवर्तन; पुनद, चणकापूरमधूनही सोडले पाणी

0

नाशिक । दि. 3 प्रतिनिधी
नगर जिल्ह्याची तहान भागवण्यासह सिंचनासाठी दारणा धरणातून 2800 दलघफू पाणी सोडण्यात आले.

गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याद्वारे हे पाणी सोडण्यात आले. पुढील 20 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यासह नगर, वैजापूरला याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे पुनद आणि चणकापूर धरणातूनही आज पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

दारणा धरणात नगर जिल्ह्यासाठी सिंचन आणि बिगर सिंचनचे आरक्षण असते. त्यानुसार रोटेशनप्रमाणे हे आवर्तन सोडले जाते.

दारणा धरण समूहात 3983 दलघफू पाणीसाठा आहे. दारणा नदी आणि नांदूरमध्यमेश्वर येथून निघणार्‍या गोदावरी डावा आणि उजवा अशा दोन कालव्यांवर नाशिक, सिन्नर, राहता, वैजापूर, कोपरगाव या तालुक्यांतील 81 व 11 औद्योगिक वसाहतींच्या योजना अशा एकूण 92 पाणी योजना आहेत.

गोदावरी उजवा कालवा 110 किलोमीटरचा असून यातून कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर तालुक्यांना तर डावा कालवा 90 किलोमीटरचा असून यातून निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर या तालुक्यांतील गावांना शेतीसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातून पाण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले. मात्र आज दारणातून पाणी सोडण्यात आल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे चणकापूर धरणातूनही 300 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

या धरणावर कळवण तालुक्यातील 152, देवळ्यातील 64, बागलाण तालुक्यातील 76, मालेगावमधील 24 अशा एकूण 316 गावांना गिरणा आणि पूनद नदीद्वारे आवर्तन पद्धतीने पिण्यासाठी पाणी सोडले जाते.

त्याचप्रमाणे पुनदमधूनही 50 दलघफू पाणी सोडण्यात आले असून कळवण तालुक्याला याचा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

*