नगरमध्ये कर्जबाजारी युवक शेतकर्‍यांची आत्महत्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचे घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी समोर आली. बाबुर्डी बेंद शिवारात त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. गोरक्ष कुंडलिक कडूस (वय 28) असे त्याचे नाव आहे.

 
बाबुर्डी बेंद शिवारात पठार देवी मंदिराच्या दक्षिण बाजूस शेतात एका युवकाचा अर्धवट जळालेला मृतदेह शुक्रवारी (दि. 2) सकाळी आढळून आला. किरण चोभे हे शेतात मशागतीच्या कामासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी गावातील काही मित्रांना फोनवर माहिती दिली.

 

तसेच नगर तालुका पोलिसांना दूरध्वनी करून माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. तेथे तपासणी केली असता मोबाईल, ओळखपत्र, डायरी असे साहित्य आढळून आले. सदर ओळखपत्रावर गोरक्ष कुंडलिक कडूस असे नाव होते. त्यावरून अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह गोरक्ष कडूस (रा. सारोळा कासार) याचाच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

 

 

त्याच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनीही मृतदेह ओळखला. ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासारखी परिस्थिती नसल्याने वैद्यकीय पथक घटनास्थळीच बोलावण्यात आले. कारण ही घटना दोन दिवसांपूर्वी झालेली असावी असे मृतदेहाच्या अवस्थेवरून वाटत होते.

LEAVE A REPLY

*