Type to search

नगरची जागा जिंकणारच! – रोहित पवार

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

नगरची जागा जिंकणारच! – रोहित पवार

Share

 छावण्या, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांची घेतली भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभेच्या उमेदवारीवरून पवार-विखे घराण्यात घमासान सुरू आहे. नगर लोकसभा मतदारसंघात 1991 पुनरावृत्ती करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यावर भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आम्ही 1999 ची पुनरावृत्ती करू असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच शुक्रवारी पुन्हा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी नगर दौरा करत नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. त्याअनुषंगाने त्यांनी संभाव्य उमदेवार आ. अरुण जगताप यांच्यासह पक्षातील पदाधिकार्‍यांंची भेट घेत आढावा घेतला.

शुक्रवारी दुपारी 12 वाजता अचानक रोहित पवार नगरला येत असल्याचा निरोप मिळाला. त्यानुसार कार्यकर्ते जमा झाले. पवार आल्यानंतर त्यांनी जनावरांच्या छावण्या व पिण्याच्या पाण्याच्या टँकर संदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. याठिकाणी पक्षाकडून तगडा उमेदवार देण्यात येणार आहे. नगरची जागा आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू, असे स्पष्ट केले.

तसेच जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने चारा छावण्यांना मंजुरी देऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. तरी छावण्या सुरू होत नाहीत. छावण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीची आवश्यकता नसताना त्यांची शिफारस मगितली जात आहे. तसेच भाजपच्याच कार्यकर्त्यांना छावण्या दिल्या जात असल्याचा आरोप यावेळी केला. गरज असलेल्या ठिकाणी तातडीने चारा छावण्यांना मंंजुरी देण्याची मागणी पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. तसेच आवश्यकता असलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सरचिटणीस संजय कोळगे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, बाळासाहेब जगताप, ज्ञानेश्वर कवडे, शरद चोभे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीनंतर पवार थेट जगताप यांच्या आयुर्वेदवरील कार्यालयात पोहचले. तेथे आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. जगताप पिता-पुत्र आणि पवार यांच्यात बंद खोलीत बराच वेळ खल झाला. या चर्चेत पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. याच चर्चेत भाजपचे संभाव्य उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधातील प्रचाराची रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

त्यानंतर पवार यांनी पक्षाच्या कार्यालयात जाऊन तेथेही भेट दिली. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करून ते आगामी तयारी करत आहेत. अजित पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघाचे पालकत्व रोहित पवार यांच्याकडे सोपविले आहे. त्यानंतरच पवार यांनी नगरात येत रणनीती आखल्याचे समजते.

कुकडीचे आवर्तन सोडा : पवार
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उद्भवत आहे. यामुळे कुकडीचे आवर्तन सोडल्यास नागरिकांचा व जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी कुकडीचे आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. दरम्यान कुकडीचे आवर्तन पुढील आठवड्यात सुटेल असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!