नगरचा स्त्री जन्मदर 923

0

लिंग गुणोत्तर : शेवगाव, श्रीरामपुरात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर अधिक

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याचा 2010 मध्ये असणारा 829 स्त्री जन्मदर चालू वर्षात 923 पर्यंत वाढला आहे. गर्भलिंग कायद्याची कडक अंमलबजावणी, समाज प्रबोधन, मुलगा-मुलगी एक समानचा प्रचार-प्रसार आणि शासन व सामाजिक पातळीवर झालेल्या उपाययोजनांचा हा परिणाम दिसत आहे. स्त्री जन्मदर एक हजारांच्यापुढे नेण्यात शेवगाव तालुका आघाडीवर असून तालुक्यात 1 हजार मुलांच्या जन्माच्या मागे 1 हजार 78 स्त्री जन्म दर असून श्रीरामपूर तालुक्यात हे प्रमाण 1 हजार 10 आहे.
गेल्या काही वर्षात घटलेला स्त्री जन्म दर हा सामाजिक चिंतेचा विषय ठरला होता. प्रत्येकाला आपला वारस म्हणून मुलगाच हवा या हव्यासातून स्त्री भूण हत्येचा आलेख वाढतच होता. यामुळे मुलगा आणि मुलीच्या लोकसंख्येची दरी वाढत चालली होती. भविष्यात हे प्रमाण असेच राहिल्यास त्याचे सामाजिक परिणाम सर्वांना भोगावे लागतील, या दृष्टीकोनातून सर्वच पातळ्यांवरून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू झाल्या.
यात स्त्री जन्माचे स्वागत, सरकारच्यावतीने विविध योजना, ग्रामपंचायत पातळीवर नव्याने जन्माला येणार्‍या मुलींच्या नावे ठेव ठेवणे, मुलींना मोफत शिक्षण आणि अन्य सवलतींचा यात समावेश करण्यात आला. यासह सामाजिक पातळीवर स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन मुलगा-मुलगी एक समान असल्याचे प्रबोधन करण्यात आले. याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी कमी असणारे स्त्री जन्माचे प्रमाण आता वाढू लागले आहे.
जिल्ह्यातील स्त्री जन्मदर हा गतवर्षीच्या तुलनेत वाढला आहे. 2016 मध्ये हा दर हजारी मुलांच्या जन्माच्या मागे 901 होता. तत्पूर्वी 2015 हे प्रमाण 915 होते. 2014 मध्ये 917 होते. 2013 ला 903, 2012 ला 884, 2011 ला 824 आणि 2010 ला 829 होते. यंदा मार्च 2017 अखेर हे प्रमाण 923 झाले असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

तालुकानिहाय लिंग गुणोत्तराचे प्रमाण
अहमदनगर 881, अकोला 889, जामखेड 926, कर्जत 736, कोपरगाव 954, नेवासा 986, पारनेर 823, पाथर्डी 945, राहाता 934, राहुरी 917, संगमनेर 877, शेवगाव 1078, श्रीगोंदा 992 आणि श्रीरामपूर 1010 असे आहे.

श्रीरामपूर, शेवगावची आघाडी
जिल्ह्यात मार्च 2007 अखेर शेवगाव तालुक्यात दर हजारी मुलांमागे 1078 स्त्री जन्मदर झालेला आहे. तर श्रीरामपूर तालुक्यात हे प्रमाण 1010 आहे. कर्जत तालुक्यात हे प्रमाण अवघे 736 प्रमाण झालेले असून याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*