नंदुरबार जिल्ह्यात हिवतापाचे 35 रुग्ण आढळले

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-2017 पावेतो जिल्ह्यात हिवतापग्रस्त रुग्णांची संख्या आता घटली असून केवळ 35 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा होत असून त्यानिमित्त या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सन 2010 पासून सातत्याने हिवताप रुग्णांची तपासणी केली जात असून 2010 मध्ये जिल्ह्यात एकूण 2094 रुग्ण आढळले होतेे.
2011 मध्ये ही संख्या 1694 इतकी होती. 2012 मध्ये 1073, 2013 मध्ये 736, 2014 मध्ये 644, 2015 मध्ये 634, 2016 मध्ये 295 तर मे 2017 मध्ये केवळ 35 रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून हिवतापाचे निर्मुलन आता जवळपास होत आले आहे. जिल्ह्यात डेंग्यु अथवा चिकनगुणीया या आजाराचे रुग्ण मात्र एकही आढळला नाही, असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

भविष्यात हिवतापाचे रुग्ण आढळू नये यासाठी नागरीकांनी वेळोवेळी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यात डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी व्यवस्थापन महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्व गावात नागरीकांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

तसेच स्वच्छतेच्या दृष्टीनेदेखील पाणीसाठ्याची निगा राखणे, गावातील डबकी व खड्डे बुजवणे, गटारी वाहत्या करणे, इमारतीवरील टाक्यांना ढाकणे बसविणे, संडासच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसविणे, भंगार सामानाची विल्हेवाट लावणे, घरातील कुलर, फुलदाण्या वेळीच स्वच्छ करणे आदी अनेक उपाययोजना कराव्यात असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*