Type to search

नंदुरबार

नंदुरबारात उघड्या ड्रेनेजमध्ये बालिका पडली, सुदैवाने प्राणहानी टळली

Share

नंदुरबार । शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील बालवीर चौक, नवी भोई गल्ली भागात असलेल्या उघड्या ड्रेनेजमध्ये आज दि. 21 जुलै रोजी सकाळी चार वर्षीय बालिका खेळता-खेळता पडली. सुदैवाने दुसर्‍या शालेय विद्यार्थ्याने तीला तात्काळ बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

नवनाथ टेकडी परिसरातून येणार्‍या गटारीच्या सांडपाण्याचे ड्रेनेज बालवीर चौकात आहे. पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे ड्रेनेजचे झाकण उघडे होते. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास डॉ. काणे बालमंदिराची विद्यार्थिनी यामिनी राकेश भोई (वय 4 वर्ष) रा.नवनाथ नगर, नंदुरबार ही बालिका खेळता-खेळता उघड्या ड्रेनेजमध्ये पडली. तिच्या नाका तोंडात सांड पाणी जात असताना तेथून जाणार्‍या इयत्ता सहावीचा विद्यार्थी ओम विनोद चौधरी याने क्षणाचाही विलंब न लावता ड्रेनेजमध्ये बुडणार्‍या बालिकेचा हात पकडून तिला तात्काळ बाहेर काढले. सुदैवाने ओम चौधरी याने यामिनी भोई या बालिकेस वेळीच बाहेर काढले नसते तर बालिकेस जिवानिशी मुकावे लागले असते अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी यामिनीचे वडील टेम्पो चालक राकेश भोई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बालिकेस सुखरूप घरी नेले. शहरातील अनेक ठिकाणी उघड्या ड्रेनेज गटारीमुळे सध्या पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास आणि दिवसा सांडपाण्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने उघड्या गटारींमध्ये नागरिकांसह वाहनधारक तसेच प्राणी पडण्याचा धोका वाढला आहे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्वच उघड्या ड्रेनेजवरील झाकण त्वरीत बसवून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.

दरम्यान नवनाथ टेकडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून ड्रेनेज गटारीमध्ये शहाळे, प्लास्टिक बाटल्या आणि कचरा सर्रास टाकला जात असल्याने गटारी तुंबत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. नंदुरबार नगरपालिकेतर्फे घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले आहेत. याचबरोबर कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी घरोघरी येत असून नागरिकांनी टाकाऊ वस्तू गटारीत न फेकता घंटागाडीत द्याव्यात असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!