नंदिनीची झाली ‘नासर्डी’! ; आरोग्य धोक्यात ; प्रदूषणमुक्तीची गरज

0

नाशिक (अशोक निसाळ) : नाशिकमधील सुप्रसिद्ध असलेल्या नद्यांपैकी एक म्हणजे नंदिनी अर्थातच नासर्डी नदी. मात्र या नदीची आता विल्हेवाट लागली असून तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मनपाने 1 एप्रिलपासून गोदाप्रदूषण करणार्‍यांवर दंड वसुलीची मोहीम हाती घेतली जाणार असून त्याचप्रमाणे नंदिनीकडेही लक्ष घालण्याची वेळ आली आहे.

कारण वाळू माफियांकडून केला जाणारा उपसा, नागरिकांकडून टाकले जाणार्‍या टाकाऊ वस्तू यामुळे नंदिनीची हालआपेष्टा बघवत नाही. ही पूर्णत: प्रदूषित झाली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नंदिनी रौद्ररूप धारण करते. त्यामुळे या शिवारातील नदीकाठच्या अनेक रहिवाशांची घरे पाण्याने वेढली जातात तर अनेक शेतकर्‍यांच्या शेतमालाचेदेखील मोठे नुकसान होते.

सातपूर व सिडकोतील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी असलेली नंदिनी नदी दिवसेंदिवस गटारीचे पाणी मिसळत गेल्याने नासर्डी बनली. नंदिनीलगत असलेल्या रहिवाशांचा नदीपात्रात साचलेल्या प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक कंपन्याचे रसायनमिश्रित पाणी, लोकांनी टाकलेले निर्माल्य आदींमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानवच या प्रदूषणाला जबाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.

त्यामुळे आपले आरोग्य, आपल्या हातात असे प्रत्येकाने मनाशी खूणगाठ बांधल्यास निरोगी आरोग्य अबाधित राहण्यास वेळ लागणार नाही.

शहरातील अनेकांनी नंदिनी नदीच्या काठावर अनधिकृतपणे बांधकामे केल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अनेकांची घरे पाण्याने वेढली जातात तर असंख्य रहिवाशांच्या घरांतदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले जातेे. त्यामुळे अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

नदीच्या आजूबाजूचा परिसरातील महिला येथे सर्व कपडे धुण्यासाठी येतात, त्यामुळेही नदी प्रदूषित होते. कपडे सुकण्यासाठी याच ठिकाणी वाळत घालतात. त्यामुळे हा परिसर नेमका धोबीघाट आहे का? असा प्रश्न नेमका येथील प्रवास करणार्‍या चालकांना पडतो.

संपूर्ण नदी प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी वेढलेला असून यामध्ये असलेली संपूर्ण वाळू जवळपास असलेल्या वाळू माफियांनी उपसली असून संबंधित अधिकारी हे जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळेही संबंधित अधिकार्‍यांवर संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.

नदीचे कडेकपारही रस्त्याला मिळाले असल्याने रस्त्याच्या लेवलने पात्र आल्याने येथे मोठा अपघात होण्याचे चिन्ह दिसू लागले असून तिचे अस्तित्व नाहिसे होण्याचा मार्गावर आहे. नासर्डीची ही दूरवस्था पाहून संबंधित विभागाने लक्ष घालून स्वच्छ करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*