Type to search

ब्लॉग

धोक्याचे वळण

Share

वयात येणार्‍या मुलांना काहीतरी वेगळे वाटत असते. कोणाशी बोलावे तेही कळत नसते. संकोच आणि सगळाच गोंधळ असतो. या अडनिड्या वयात काय गंमत असते ते आपण समजून घेत आहोत..

अस्वच्छता, विशिष्ट सवयी, औषधे तसेच लागण झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले तर जंतुसंसर्ग होऊ शकतो. जननेंद्रियांमार्फत आणि लैंगिक क्रिडेत संपर्कात आलेल्या अन्य अवयवामार्फत जोडीदाराला हा संसर्ग होतो. जननेंद्रियांना होणारे काही संसर्ग हे लैंगिक संबंधाशिवायही होऊ शकतात. त्यांचा लैंगिक क्रियेशी काही संबंध नसतो. या संसर्गाची लक्षणे लैंगिक क्रियेतून होणार्‍या संसर्गाच्या लक्षणांसारखीच असतात. या संसर्गास ‘लैंगिक क्रियेद्वारा परावर्तित संसर्ग’ असे म्हटले जाते.

अनेक आजार लैंगिक संबंधातून पसरतात (उदा. ‘बी’ प्रकारची कावीळ, मूत्रनलिका – दाह इ.) एच.आय.व्ही. / एड्स हा आजार मुख्यत्वेकरून लैंगिक संबंधातूनच पसरतो. याशिवाय गरमी, जांघेतील गाठी यांसारखे अनेक आजार ज्यांना पूर्वी गुप्तरोग म्हटले जायचे असे आजार लैंगिक संबंधातून पसरणारे आजार आहेत.

अशा प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असणार्‍या लैंगिक संबंधांना ‘असुरक्षित लैंगिक संबंध’ असे म्हटले जाते. साहजिकच कोणत्याही व्यक्तीचे एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध येत असतील तर संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो. मात्र सार्वजनिक मुतारीत लघवी करणे, हस्तमैथुन करणे यामुळे हे रोग होत नाहीत. झालेला रोग कुमारिकेशी संभोग केल्याने जातो या भयंकर गैरसमजुतीतून अनेक निष्पाप मुली बलात्कार व आजारांना बळी पडतात. अशा वेळी उपचार करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच अशा गुन्हेगारांना शासन होण्यासाठी कायद्याला मदत करणे महत्त्वाचे.

* लैंगिक क्रियेद्वारा परावर्तित संसर्गाची सर्वत्र आढळणारी काही लक्षणे म्हणजे…
स्त्रियांमध्ये योनीमार्ग तसेच जननेंद्रियाभोवती दुखर्‍या किंवा न दुखर्‍या जखमा होणे, अंगावरून रक्तमिश्रित किंवा दह्यासारखे किंवा पिवळसर पांढरा स्राव जाणे, वारंवार लघवीला होणे, तीव्र स्वरुपाचा मूत्रनलिकेचा दाह होणे, जननेंद्रियांभोवती व्रण होणे, चट्टे पडणे, त्या भागास खाज येणे, वाईट वासाचे स्राव पाझरणे, अंतर्वस्त्रावर डाग पडणे, जननेंद्रियाभोवती बारीक मोत्यासारखे पुरळ, मस किंवा कोंब येणे, जांघेतील ग्रंथींना सूज येणे, त्या ठणकणे, त्यातून पू येणे इत्यादी लक्षणे दिसतात.

पुरुषांमध्ये अशा रोगात लघवीवाटे पू जाणे, लघवीला जळजळ होणे. (कमी पाणी प्यायल्याने होणार्‍या जळजळीपेक्षा ही जळजळ वेगळी असते.) इंद्रियाला जखमा होणे. जांघेमध्ये गाठी येणे, अंडाशयास सूज येणे, जननेंद्रिय लाल होते, त्यावर मस किंवा पुरळ उठणे, व्रण उठणे.

सामान्यतः या संसर्गाची लागण एका व्यक्तीद्वारे दुसर्‍या व्यक्तीस लैंगिक क्रियेतून होते. काही संसर्ग बाह्य चिन्हातून आपल्याला समजतात मात्र काही संसर्गाची कोणतीही बाह्यचिन्हे दिसत नाहीत. सुरुवातीला लक्षात आल्यास काही संसर्गावर वेळीच उपाय करता येतात अन्यथा काही संसर्ग अतिशय गंभीर स्वरूप धारण करू शकतात. (क्वचित प्राणघातकही ठरतात.)

एच.आय.व्ही. / एड्स
एच.आय.व्ही. विषाणूंचा संसर्ग प्राणघातक असल्यामुळे तो सर्वात जास्त धोकादायक असतो. एच.आय.व्ही. म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस. यामुळे एड्स होऊ शकतो. एड्स हे त्याच्या पूर्ण इंग्रजी नावातील (एक्वायर्ड इम्युनो डेफिशिएन्सी सिन्ड्रोम) आद्याक्षरांवरून बनवलेले छोटे संक्षिप्त नाव आहे. याचा अर्थ बाहेरून आलेल्या कारणाने प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे दिसणार्‍या लक्षणांचा समूह.

एड्स कशामुळे होतो?
हा आजार एका प्रकारच्या विषाणूंमुळे (व्हायरस) होतो. हे विषाणू अतिसूक्ष्म जंतू असतात. ते कुठल्यातरी जिवंत पेशीत शिरून पेशींचीच यंत्रणा वापरून आपली संख्या वाढवतात व त्या पेशीचा नाश करतात. शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट करणार्‍या या विषाणूंची एच.आय.व्ही.ची लागण हा पहिला टप्पा आहे. लागण होण्यापासून प्रत्यक्ष एड्सचा आजार होण्यास लागणारा कालावधी व्यक्तीनुसार वेगवेगळा असतो. प्रतिकारशक्ती मुळातच कमी असेल तर एड्सचा आजार लवकर होतो. काहींच्या बाबतीत हा कालावधी 8/10 वर्षे इतकाही असू शकतो. एड्सचा प्रत्यक्ष रोग होण्यासाठी एवढा कालावधी जावा लागत असला तरी एच.आय.व्ही. विषाणूंचा संसर्ग झालेली व्यक्ती (एचआयव्ही पॉझिटिव्ह) ही कायम रोगवाहक असते. म्हणजेच अशा व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. ज्यावेळी प्रत्यक्ष लक्षण दिसतात त्यावेळी एड्सचा आजार झाला असे म्हणतात. ज्यावेळी प्रतिकारशक्ती विशिष्ट मर्यादेपलीकडे कमी होऊ लागते तेव्हा इतर अनेक रोगांचे जंतू शरीरावर हल्ला करतात. त्यामुळे वारंवार आजारी पडणे, एकाच वेळी अनेक प्रकारचे आजार होणे या लक्षणांना सुरुवात होते. (क्रमशः)
meghamanohar1971@gmail.com
मेघा मनोहर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!