Type to search

क्रीडा

धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

Share

अँटिग्वा | भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याआधी झालेल्या ३ दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंनी आपली चमक दाखवत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आता कसोटी मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दोन सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. विंडिजविरुद्ध उद्यापासून खेळवल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीसमोर दोन मुख्य पेच असतील. यातील पहिला म्हणजे अनुभवी रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांच्यात कोणाला खेळवायचे आणि दुसरे म्हणजे पाच गोलंदाजांसह मैदानात उतरायचे का? भारताने बचावात्मक पवित्र्यावर भर देत केवळ चारच गोलंदाज खेळवायचे ठरवले तर रोहित व अजिंक्य या दोघांचाही संघात सहज समावेश होईल. पण, पाच गोलंदाज खेळवणे निश्‍चित झाले तर रोहित व अजिंक्य यांच्यापैकी एकाला संघातून बाहेर बसवावे लागेल.

भारतीय संघ जवळपास साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळणार असून कोहली-रवी शास्त्री येथे अतिरिक्त सहावा फलंदाज खेळवणार की जादा गोलंदाज, हे पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी येथे स्पष्ट होईल. केएल राहुल व मयंंक अग्रवाल सलामीला उतरू शकतात. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील दोन कसोटीत राहुलला संघातून वगळले गेले होते. क्वचितप्रसंगी सराव सामन्याप्रमाणे येथेही हनुमा विहारीला सलामीला धाडण्याचा निर्णय होऊ शकतो. विहारीने यापूर्वी नव्या चेंडूवर अपेक्षित फटकेबाजी केलेली नाही. पण, त्याने चेंडूची लकाकी कमी करण्यावर भर दिला आणि याचा नंतर अग्रवाल व चेतेश्‍वर पुजारा यांना लाभ झाला आहे. केएल राहुलचे मागील वर्षभरातील कसोटीतील खराब प्रदर्शन विचारात घेतले तर येथे त्याला डच्चू मिळू शकतो आणि विहारीला संधी मिळू शकते. कसोटी मालिका जिंकून दौर्‍याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!