Type to search

धुळे

धुळे शहर पोलीस निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीची सुटका

Share

धुळे । परधर्मीय युवकाच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे़ मुलीची सुटका करत त्यांनी तिच्या पालकांना त्या मुलीला स्वाधीन केले़

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी धुळ्यातील मोहाडी उपनगरात राहणार्‍या आपल्या मोठ्या बहिणीकडे आली होती़ बहिणीच्या घराचे रंगकाम सुरु असल्याने तेथे काम करणार्‍या एका परधर्मीय मुलाशी तिची ओळख झाली़ हा मुलगा साक्री रोडवरील शनीनगरात वास्तव्याला होता़ या दोघांमध्ये सूत जुळल्याने मुलीने आपले सर्वस्व पणाला लावले़ गेल्या आठवड्यात या मुलाने तिला मंगरुळ येथून पळवून आणले़ मात्र, धुळ्यात आल्यावर तिला घराच्या तळघरात डांबून ठेवण्यात आले़ या दरम्यान तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याने ती हादरुन गेली होती़ तिकडे मुलीचे आई-वडील चिंतेत पडले होते़ त्यांना आपली मुलगी धुळ्यात असल्याचे समजल्यावर त्यांनी धुळ्यात येऊन त्या मुलाचा पत्ता शोधून काढला़ त्या ठिकाणी गेल्यावर पालकांना मुलगी भेटली नाही़ उलट त्या मुलासह त्याच्या वडिलांनी तुमची मुलगी आमच्याकडे नाही, असे सांगत शिवीगाळ करून धमकावत हाकलून लावले़

या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ त्यावरून भादंवि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर पोलिसांनी कारवाई सुरु करण्याआधीच एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही बाब शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना कळाली़ त्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वत:च तपासाची चक्रे फिरविली़

शोध पथकातील कर्मचार्‍यांच्या माध्यमातून त्या मुलाचे घर शोधून काढले़ तेथे गेल्यावर पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे मिळाली़ मात्र पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी पोलिसी खाक्या दाखविताच पीडित मुलीसह हा नेमका काय प्रकार आहे हे समोर आले़

शहर पोलिसांनी त्या मुलीचा ताबा घेत तिला पोलीस ठाण्यात आणले़ तिच्या आई-वडिलांसह अमळनेर पोलिसांना माहिती कळविण्यात आली़ मोहाडी येथील तिची बहिण-मेहूणेही पोलीस ठाण्यात दाखल झाले़ नातलगांना पाहिल्यानंतर या मुलीने आपबिती कथन केली़ हे ऐकून सर्वांचा संताप झाला. मात्र ही मुलगी केवळ 15 वर्षाची असल्यामुळे प्रकरण संयमाने घेण्यात आले़

अमळनेर पोलीस त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करुन कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले़

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!