धिंगाणा अवकाळी!

0

दोघांचा बळी / शहरात बत्तीगुल / खांब कलथुनि गेला / घरांची पडझड / वृक्ष उन्मळले

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहर आणि उपनगराला गुरूवारी वादळाचा तडाखा बसला. या वादळी वार्‍याने जिल्ह्यांत दोघांचा बळी गेला. नगर शहरात विजेचे खांब, झाडे उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्याने शहर व उपनगरांतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. शहरालगतच्या बुरूडगाव येथे घरांची पडझड झाली. शाळांवरील पत्रे उडाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळाने हे थैमान घातले.

दरम्यान, जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे युवकाचा, तर संगमनेर तालुक्यात वीजेचा खांब पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहर आणि उपनगरातील काही भागात शुक्रवारी सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरूळीत नव्हता. यामुळे शुक्रवारी सकाळपासून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरूस्तीच्या कामाला जुंपले होते. दरम्यान, महसूल विभागाने वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगर शहरासह सावेडी, केडगाव, भिंगार या उपनगरांनाही वादळी वार्‍याचा फटका बसला. नगर शहरात गुरुवारी दुपारी तीननंतर वातावरणात अचानक बदल झाला. वादळी वारे सुरू झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. वार्‍यामुळे चौपाटी कारंजा येथे एक पथदिव्याचा खांब व त्यावर लावण्यात आलेला फलक वीज तारांवर पडल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
कोठला परिसरातील राज चेंबरजवळही एक विजेचा खांब पडला. वसंत टॉकीज परिसरातील शेरकर गल्ली येथे फायबर शेड वादळी वार्‍यामुळे उडून गेले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, वादळी वार्‍यामुळे गोविंदपुरा येथे एक झाड रस्त्यावर पडल्याने डीएसपी चौक ते भिंगार रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली. गंगा उद्यानाजवळ एक झाड रस्त्यावर पडले होते.
अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले विजेचे खांब व झाडे बाजूला करण्याचे काम सुरू केल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली होती. बुरुडगाव रोडवरील जेपीएम इंग्लिश मीडिअम स्कूलच्या सहा खोल्यांवरील पत्रे वादळी वार्‍यामुळे उडाले असून शाळेची भिंतही कोसळली. यामध्ये एका दुचाकीचे नुकसान झाले.
जोराचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या. त्यात तुटलेल्या झाडांच्या फांद्या नगर-दौंड मार्गावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नगर शहराच्या उपनगरांमधील केडगावमध्ये दूधसागर सोसायटीतील एका घराचे पत्रे उडाले, तर एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात नगर-पुणे महामार्गावर वादळाने काही ठिकाणी फ्लेक्सचे खांब कोसळले.
भिंगार रस्त्यावरील वडाचे एक झाड कोसळल्याने तेथील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद, अरणगाव, सोनेवाडी, खडकी, खंडाळा, अकोळनेर, भोरवाडी, सारोळे कासार परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. शहरातील केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, एमआयडीसी, निंबळक परिसरातही वादळ व पावसाने हजेरी लावली.

सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत होईल
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वादळामुळे शहरात चौपाटी करांजा, दिल्ली गेट, तेलीखुंट, माळीवाडा, सावेडी, फकिरवाडा, तसेच उपनगरातील काही भागात विजेच्या तार तुटल्या आहेत. काही ठिकाणी वायर तुटली, फ्यूज खराब झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचार्‍यांनी शहरातील विविध ठिकाणी दुरूस्तीचे काम हाती घेतले असून सायंकाळपर्यंत शहरासह उपनगरातील वीज पुरवठा सुरळित होईल असे सांगितले आहे.

 जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा येथे 17 मिमी, बेलवंडीमध्ये 2 मि.मी. श्रीरामपूर 6 मि.मी. पुणतांबा 90 मि.मी, बाभळेश्‍वर 52 मि.मी. करंजी 23 मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.

 जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आश्‍वी (ता. संगमनेर) येथे वीजेचा खांब अंगावर पडून जखमी झालेल्या सुगंधा सारस्कर या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) येथील गोकुळ वाघ यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपुरमध्ये एक गाय दगावली.

 

LEAVE A REPLY

*