धास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची!

0
हवामानातले बदल आणि पर्यावरण संरक्षणासाठी जगभर होणार्‍या बैठका-शिखर परिषदांमध्ये अनेक करार केले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी योग्य प्रमाणात होत नसल्याने कार्बन उत्सर्जन ही आगामी पिढ्यांवर विपरीत परिणाम करणारी बाब बनत आहे. त्यातच कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे निर्बंध शिथिल करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होण्याच्या चिंतेने तज्ञ आणि संशोधक चिंतीत झाले आहेत.

जगभर सर्वत्र कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जोरदार प्रयत्न आहेत. कारण सजीवसृष्टीचे संपूर्ण भवितव्यच त्यावर अवलंबून आहे. विकसित राष्ट्रांची ‘विकास’ ही संकल्पना तपासून पाहण्याची ही वेळ आहे. विकास म्हणजे निसर्गाचा र्‍हास आणि औद्योगिकरण असे समीकरण बनल्यामुळे जंगलांचा वाढत्या प्रमाणात र्‍हास झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. निसर्गाचे चक्र अडखळत फिरू लागले. हळूहळू ते अनियमित झाले. परिणामी जगभर आगामी उत्पातांची आणि आपत्तींची चुणूक दिसू लागली. अमेरिकेसारख्या महासत्तेची सत्तासूत्रे ताब्यात घेणार्‍या ट्रम्प यांनी कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांनाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या अभ्यासानुसार, ट्रम्प यांच्या हवामान निर्बंधमुक्ततेमुळे 2025 पर्यंत वार्षिक 20 कोटी टन अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमधील संशोधन गटाच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. स्टेट एनर्जी अ‍ॅण्ड एनव्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट सेंटरतर्फे हे संशोधन हाती घेण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामानातल्या बदलाशी संबंधित सहा प्रमुख नियम मागे घेतल्याच्या परिणामांचे विश्लेषण या संशोधनातून करण्यात आले आहे. हवामानातल्या बदलांना आळा घालण्याशी हे नियम पुन्हा लागू करण्याचा मात्र ट्रम्प यांचा विचार नसल्याने या संशोधनाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

सध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. जगात हरितवायूंच्या उत्सर्जनात चीनचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिका या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगभर सर्वत्र हवामानातल्या बदलांचे अत्यंत वाईट परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. जिवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे हवामानात बदल होत असून ते विविध रूपांनी सातत्याने समोर येत आहेत. एकट्या अमेरिकेलाच गेल्या वर्षभरात काही भयानक वादळांना तोंड द्यावे लागले. याखेरीज समुद्राची पातळी वाढणे, दुष्काळ आणि प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळे, महापूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना जगाला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर अ‍ॅटर्नीज जनरलच्या वॉशिंग्टन मधल्या संमेलनात प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात या सगळ्या भयावह परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राष्ट्रीय वाहन धूर उत्सर्जनासाठी मानांकन निश्चित करणे आणि ओबामांच्या काळातला क्लीन पॉवर प्लॅन पुन्हा आणणे या दोन गोष्टी कराव्यात, असे या अभ्यासातून सुचवण्यात आले आहे. क्लीन पॉवर प्लॅन हा ऊर्जा प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन मर्यादित ठेवण्याला महत्त्व देणारा होता. शिवाय प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या प्रमुख उद्योगांवरही या योजनेतून लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

वास्तविक, ट्रम्प यांनी या उपाययोजना मागे घेतल्यानंतर मेरीलँडसह न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्स इथल्या सुमारे 12 स्टेट अ‍ॅटॉर्नी जनरलनी प्रशासनाला न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु ट्रम्प यांनी या कशाचीच दखल घेतलेली नाही. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर किती असावा याची मर्यादा ठरवण्याचा नियम ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला. त्याला कॅलिफोर्नियातून आव्हान देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारे या उत्सर्जनाची मर्यादा ठरवण्याचे बंधन काढून घेण्यात आले तर 2015 पर्यंत सध्याच्या वार्षिक 34 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात आणखी 16 दशलक्ष टन उत्सर्जनाची भर पडेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याखेरीज राष्ट्रीय स्वच्छ कार मानांकन नसेल तर इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे 2035 पर्यंत अमेरिकन ड्रायव्हर्सवर अतिरिक्त 193 अब्ज ते 236 अब्ज डॉलर्सचा बोजा पडेल. मात्र ट्रम्प प्रशासनाने उत्सर्जन मानांकनांमध्ये बदल करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. या मानांकनांना चिकटून राहिल्यास स्वयंचलित दुचाकी महाग होतील, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ट्रम्प पूर्वीपासूनच उद्योजक होते आणि आताही राष्ट्राध्यक्षापेक्षाही उद्योजकच आहेत, हे स्पष्ट आहे. साहजिकच अमेरिकेतले प्रदूषण कमी होण्याऐवजी अमेरिका स्वतःसह जगाचेही भवितव्य धोक्यात लोटत आहे.

ट्रम्प यांनी ओबामांच्या क्लीन पॉवर प्लॅनऐवजी स्वत:ची अ‍ॅफोर्डेबल क्लीन एनर्जी रूल ही योजना आणली आहे. त्यामुळेही कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ होणार असून खराब हवेमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने पूर्वीच्या योजनेइतकेच या योजनेद्वारेही उत्सर्जन कमी होईल, असा दावा केला आहे. अर्थातच ट्रम्प आणि जागतिक तापमानवाढीच्या विरोधात मत व्यक्त करणार्‍यांना आता अमेरिकेला तोंड द्यावे लागत असलेल्या सततच्या मोठमोठ्या वादळांनी काही प्रमाणात मवाळ बनवले आहे, असाही याचा अर्थ आहे. हवामानातील बदल प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसू लागल्यामुळे त्यांना नाईलाजाने का होईना, परंतु आपली विकासाची संकल्पना चुकीची असावी, असे वाटू लागले आहे. मात्र त्यांना ते उमजेपर्यंत आणि त्यानंतर त्यांनी तशी कृती करेपर्यंत जगाचा विनाश जवळ येऊन ठेपेल, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत.

याआधीही जगाने असे विनाश पचवले आहेत, असे मत संशोधकांनी अनेकदा मांडले आहे. नेमकेपणाने सांगायचे तर 1990 पर्यंत शास्त्रज्ञ असा निष्कर्ष मांडत आले होते की लघुग्रह आदळल्यामुळे आतापर्यंत तब्बल पाचवेळा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीचा विनाश घडून आला आहे. यात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनासॉर नामशेष झालेल्या घटनेचाही समावेश होता. आता मात्र पृथ्वीवरचे इतर चार मोठे संहार हे वातावरणात आणि समुद्रात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे झाले असावेत, असे संशोधकांचे मत बनले आहे. या संहारांपैकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढून झालेला उत्पात सर्वात भयंकर मानला जातो. यामुळे काही हजार वर्षांमध्ये सजीवांच्या 90 टक्के प्रजाती नामशेष झाल्या होत्या. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी हे घडले असावे, असेही मानले जाते. मात्र यातून कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कोणत्याही कारणाने वाढले तरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो, यावर शिक्कामोर्तबच होते.

म्हणूनच हे प्रमाण कमी करण्यासाठी जगातल्या देशांनी आपापल्या भागांमधले कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी हिरवाईत वाढ करणे किंवा वनीकरण करणे, जंगलतोड थांबवणे, प्रदूषण करणार्‍या औद्योगिकरणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना देणे, सार्वजनिक वाहतुकीची साधने चांगली बनवून वैयक्तिक वाहनांच्या संख्येला आळा घालणे इ. उपाययोजना कराव्यात, असे तज्ञांचे मत आहे. मात्र याबरोबरच आता महासत्तांनी बेछूट निर्णय घेऊन जगाला विनाशाच्या गर्तेत लोटू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची गरजही व्यक्त होत आहे. यासंदर्भात नुकताच एक आशेचा किरण दिसला आहे. मेलबर्न इथल्या आरएमआयटी युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईडला वायुरूपातून घनरूपात आणण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतील. पहिली म्हणजे हवेतले कार्बनचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होईल आणि दुसरी म्हणजे कार्बनपासून कोळसा तयार करणे शक्य झाल्यामुळे इंधननिर्मितीही होईल. नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वातावरणातल्या हरितवायूंना सुरक्षितपणे आणि कायमस्वरुपी हटवण्याच्या या संशोधनाने अनेक तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या कार्बन डाय ऑक्साईडला दाबून द्रवरूपात आणणे आणि योग्य ठिकाणी जमिनीत सोडणे असे तंत्र वापरणे शक्य आहे. परंतु काही अभियांत्रिकी आव्हानांमुळे याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. शिवाय आर्थिकदृष्ट्याही हे तंत्र महागडे आहे. तसेच साठवणुकीच्या ठिकाणांमधून गळती होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. टोर्बन डीनेक यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केलेले ताजे संशोधन नक्कीच उत्तम दिशा दाखवणारे आहे. फक्त यासाठी लागणारा पैसा आणि प्रकल्प राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे संशोधकांचे म्हणणे नक्कीच विचार करायला लावणारे आहे.
– अभय देशपांडे

LEAVE A REPLY

*