धर्मवेड्या आसुरांना चपराक

0
काही ना काही निमित्त वा खुसपट काढून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करीत आहेत का? अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्यास परवानगी मिळावी म्हणून एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली. तिच्या सुनावणीवेळी ‘देशात शांतता राहावी, लोकांनी शांततेत जीवन जगावे असे तुम्हाला वाटत नाही का? या देशाला तुम्ही शांततेत नांदू देणार नाहीत’ अशा शब्दांत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

अयोध्येतील राममंदिरप्रश्न हा संवेदनशील मुद्दा आहे. तथापि तोच विषय पुन:पुन्हा उपस्थित करून धगधगता राहील याची काळजी विशिष्ट वृत्ती, प्रवृत्ती व शक्ती जाणून-बुजून करीत आहेत का? अयोध्या प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच तीन सदस्यीय मध्यस्थ समिती नेमली आहे. तरीही याचिका दाखल होते यावरून सरन्यायाधिशांनी ही प्रतिक्रिया दिली असावी. सामाजिक वातावरण कलुषित करण्यासाठी याचिकेचा मार्ग स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही अशीच याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला पाच लाखांचा दंड केला होता. सरन्यायाधिशांनी व्यक्त केलेले मत ही शांतताविरोधी आसुरी शक्तींना सणसणीत चपराकच आहे. राममंदिरप्रश्नी वारंवार याचिका करणारे व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे, तो चराचरात भरला आहे, अशी भारतीय समाजाची श्रद्धा आहे. मग रामाची उपासना करण्यासाठी देवालय वा विशिष्ट ठिकाणाची काय गरज? मात्र एखाद्याने राजकीय महत्त्वाकांक्षेने एखादी युक्ती उपयोगात आणली की अनेक उपटसुंभांना त्यातून प्रेरणा मिळते. राजकीय पक्ष वा त्यांच्याशी संबंधित संस्था-संघटनांना अशा उपद्व्यापात खास रस असतो.

द्वेष निर्माण करून संशयाचे वातावरण सतत वाढावे असा प्रयत्न या प्रवृत्ती सदैव करतात. विविधतेत एकतेचा आविष्कार घडवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. राज्यघटनेने ही विविधता विचारात घेऊन आचार-विचार स्वातंत्र्याची मुभा व मोकळीक नागरिकांना दिली आहे. देशात सर्वधर्मिय व प्रांतीय लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मात्र ही एकता, अखंडता आणि परस्परांचे सौहार्द काही असंतुष्ट व अतृप्त आत्म्यांना का पाहावत नाही? म्हणूनच कोणत्या ना कोणत्या कारणावरून, विशेषत: धर्म-जातीवरून परस्परांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्ती हेतूत:

करीत असाव्यात. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. त्याला गालबोट लागू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची, प्रामुख्याने सत्तारूढ पक्षाची आहे. ती वेळीच ओळखली जाईल का?

LEAVE A REPLY

*