धन्वंतरीतच चालतोय जीवाशी खेळ!

0

चांदवड|हर्षल गांगुर्डे-चांदवड उपजिल्हा रूग्णालयात बाह्य रूग्ण तपासणी कक्षात वैद्यकिय अधिकार्‍यांच्या वरदहस्ताने वैद्यकिय शिक्षणाची पदवी नसलेला बोगस डॉक्टर रूग्णांची तपासणी करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.
सदर प्रकार बुधवार (दि.१) रोजी बाह्य रूग्ण तपासणीच्या नियोजीत वेळेत सुरू असतांना तिथे प्रमोद निकम हे आपल्या दहा वर्षाचा मुलगा यशची प्रकृती खराब असल्याने तपासणीसाठी आले असता तपासणी कक्षात डॉक्टरांच्या खुर्चीवर बसून तपासणी करणार्‍या डॉक्टरांविषयी शंका बळावल्याने त्यांनी रूग्ण कल्याण समिती सदस्य तुकाराम सोनवणे यांना संपर्क करून रूग्णालयात बोलावले. सोनवणे यांनी माहिती घेतल्यानंतर सदर व्यक्ती बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले. दरम्यानच्या काळात सदर बोगस डॉक्टरने पळ काढला.

याबाबत कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी अभिजीत नाईक यांना विचारले असता त्यांनी सदर बोगस डॉक्टर रूग्णालयात कायमच सहकार्य करत असल्याचा अजबच खुलासा देत एक प्रकारे बोगस डॉक्टरला समर्थन असल्याची कबुली दिली.
दरम्यान उशिराने प्रगटलेल्या अधिक्षक मंदाकिनी बर्वे यांना रूग्ण कल्याण समितीचे सोनवणे व उपस्थित रूग्णांनी घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता बर्वे यांनी असे प्रकार होतच राहतात शेवटी आम्ही माणसंच आहोत असे बेजाबदार वक्तव्य करत उपस्थितांना अचंबित केल्याने रूग्णांना आपणच चुकलो की काय? होणार्‍या गैरकारभाराबद्दल सर्वसामान्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्‍न पडला.
तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात उपचार उपलब्ध होण्याचे शासनाचे उपजिल्हा रूग्णालय हे चांदवड येथे असून येथे तालुक्यातील ११२ गावांतून रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात परंतू या धन्वंतरीतच राजरोसपणे रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचा जीवघेण्या खेळावर नियंत्रण कुणाचे? लोकप्रतिनिधी नावापुरतेच उरले का? अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली असून यावर आता तरी कारवाई होईल का? की एखाद्या निष्पाप व्यक्तिच्या बळी गेल्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का?

औषधांबाबत तु तू मैं मैं 

चांदवड उपजिल्हा रूग्णालयात येणार्‍या रूग्णांना पुरेशा प्रमाणात औषधे मिळत नसल्याने खाजगी मेडिकलमधून औषधे घेण्याची वेळ येऊन ठेपल्याने खिशाला झळ बसत आहे. दरम्यान औषध विभागाचे प्रमुख एन. ई. पवार यांनी मुबलक औषध साठा उपलब्ध असल्याचे सांगत असतांना दुसरीकडे अधिक्षक बर्वे यांनी रूग्णालयाला औषधांचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे सांगितल्याने यात द्वयींतच समन्वय नसल्याचे उजेडात आले

चांदवड उपजिल्हा रूग्णालयातील आज झालेला प्रकार पाहता जनतेच्या आरोग्याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पाच महिन्यापुर्वी आम्ही शासनाला याबाबत पत्र व्यवहार करूनही सुधारणा झालेली नाही. घडल्या प्रकाराची जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. जगदाळे यांना माहिती दिली आहे.
-तुकाराम सोनवणे.
रूग्ण कल्याण समिती सदस्य

 

LEAVE A REPLY

*