धन्वंतरींना धडा!

0

मराठी मुलखात गाजलेल्या बीडमधील स्त्रीभ्रूणहत्या खटल्याचा ऐतिहासिक निकाल बीड जिल्हा सत्र न्यायालयाने नुकताच दिला. स्त्रीभ्रूणहत्यांचे महापाप जोडीने करणारे दाम्पत्य डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे या दोघा क्रूरकर्म्यांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मुंडे दाम्पत्याच्या क्रूरकृत्याची शिकार झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यालाही न्यायालयाने सक्तीमजुरीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाचा हा निकाल कदाचित डॉक्टरवर्गाला धक्का देणारा आणि विचलित करणारा ठरेल. साठ खोल्या आणि एकशे वीस खाटांची व्यवस्था करून गर्भपात करण्याचा आपला अघोरी धंदा डॉ. मुंडेने सुखेनैव चालू ठेवला होता. ‘लेक लाडकी’ या संस्थेच्या प्रयत्नांमुळेच त्याच्या कत्तलखान्याचा भंडाफोड झाला. गर्भलिंग चिकित्सा आणि मुलीचा गर्भ पाडण्यासाठी त्याच्या रुग्णालयात राज्यभरातून गरजू रुग्ण येत.

सोनोग्राफीने महिलेच्या गर्भात स्त्रीभ्रूण आढळले की पापाला धजावलेले डॉ. मुंडे दाम्पत्य, संबंधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने स्त्रीभू्रण नष्ट करण्याचे बेकायदेशीर काम निर्ढावलेपणे करीत. केलेल्या गुन्ह्याचा माग मागे राहू नये म्हणून ते पाळीव कुत्र्यांना खाऊ घालायचा. ‘मुलगाच हवा’ या हट्टापायी अनेकदा गर्भवतीवर तिच्या कुटुंबातील सदस्यांचा दबाव येतो. डॉ.मुंडेसारखे नराधम त्याचा गैरफायदा उचलतात. अशापैकी बहुतेक प्रकरणांत गर्भवतीच्या मनाविरुद्ध जाऊन तिचा गर्भपात केला जातो. असे प्रकार राज्यात लपून-छपून अजूनही चालूच आहेत.

अधून-मधून ते उजेडात येतात. तेवढ्यापुरती कारवाई होतेही. तर अनेक बाबतीत कारवाई थंडावतेसुद्धा! यामागील कारणे जनतेला साधारणपणे माहीतच आहेत. मात्र गरजूंच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन आपले उखळ पांढरे करणारे अनेक कसाई आजही ‘डॉक्टर’ म्हणून मिरवत आहेत. डॉक्टरांच्या दुष्कर्माचा पर्दाफाश झालेली व प्रसिद्धीस आल्यामुळे न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली गेलेली कदाचित ही पहिलीच घटना असावी. ‘उमदा व्यवसाय’ म्हणून गणल्या जाणार्‍या वैद्यकीय व्यवसायात अनेक गैरप्रवृत्तींनी शिरकाव केला आहे.

काही बाबतीत कायद्यातील गुंतागुंतसुद्धा त्याला कारणीभूत होते. डॉ. मुंडे प्रकरणापासून डॉक्टरी पेशातील मंडळींनी योग्य धडा घेतला तर न्यायालयाचा निकाल सार्थकी लागेल. वैद्यकीय व्यवसायाबद्दल जनमानसातील पूर्वापार श्रद्धा कायम राहावी असे अनेक डॉक्टरांना वाटत असेल. असे सर्व वैद्यकीय व्यावसायिक या ‘उमद्या’ व्यवसायाचे पावित्र्य टिकवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करतील का?

LEAVE A REPLY

*