दोष शिक्षणाचा की व्यक्तींचा?

0
शिक्षण म्हणजे काय, हेच समाज विसरत चालला आहे का? शिक्षण माणसाला विचार करायला लावते, माणसाची समज वाढवते, जाणीवा जागृत करते, असे समजले जाते. तरीही शिकलेली माणसे गुन्हेगारी वर्तन कसे करतात? हिंसक कसे होतात?

भुसावळ येथील डॉ. भरत पाटील यांनी आपली पत्नी विद्या यांचा खून करून तो लपवण्याचा प्रयत्न केला. आपले दुष्कृत्य कोणालाही कळू नये, यासाठी पत्नीच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचा हा प्रयत्न फसला आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आला. विद्या या सहाय्यक सरकारी वकील होत्या. दुसरा प्रकार तर सुसंस्कृत पुणे शहरातला! स्वयंपाक नीट करता येत नाही, आई-वडिलांकडून पैसे आणत नाही, लग्नात मानपान झाला नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून प्राध्यापक पतीने आपल्या पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला.

त्यामुळे पत्नीने पोलिसात तक्रार केली आहे. त्या स्वत: शिक्षिका आहेत. या दोन्ही प्रकरणांतील महिलांवर अन्याय झाला आहे. यात त्यांंचे उच्चशिक्षित पती दोषी आहेतच, पण तेवढाच दोष त्या पत्नींचाही मानावा का? या दोन्ही घटनांतील महिला उच्चशिक्षित आहेत. तरीही त्यांनी विवाहानंतर काही काळ का होईना, पण अन्याय का सहन केला? अन्याय करणार्‍याएवढाच अन्याय सहन करणारासुद्धा दोषी असतो, असे म्हटले जाते;

हे त्या कसे विसरल्या? विद्या पाटील सरकारी वकील होत्या. पुण्यातील महिला शिक्षिका आहे. तरीही या दोघींनी आपल्यावरील अन्यायाला योग्य वेळी वाचा का फोडली नसेल? घरातील अत्याचार प्रसंगी आपल्या जीवावर बेतू शकतो, ही भीतीही त्यांना भेडसावली नसेल का?

जीवाच्या भीतीपोटी तरी अन्यायाविरुद्ध दाद मागावी, असे अ‍ॅड. विद्या पाटील यांना वाटले नसेल का? अन्य एका घटनेत तर पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने तिचे नाक व कानच कापून टाकले. ही धक्कादायक घटना कर्नाटकात घडली. समाजात शिक्षणाची ज्योत पेटावी म्हणून अनेक समाजसुधारकांनी खस्ता खाल्ल्या. शिक्षणाची गंगा वंचितांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य वेचले.

सावित्रीबाई फुले यांनी शेणगोटे सहन केले. ते शिक्षण इतके निरुपयोगी कसे ठरते? शिक्षणाने माणसावर संस्कार होत नसतील, मूल्यांची रुजवण होत नसेल व जाणीवा जागृत होत नसतील तर तो दोष शिक्षणाचा की त्या व्यक्तींचा? जाणकारांनी व शासनकर्त्यांनीही अस्वस्थ व्हावे, अशी ही परिस्थिती आहे. सकारात्मक बदलांसाठी उपाय सुचवणे ही जाणकारांची व ते उपाय कठोरपणे अंमलात आणणे ही शासनकर्त्यांची जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

*