दोष नेमका कोणाचा?

0
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा परवा नाशिक एक विक्षिप्त (की विनोदी?) बातमी नुकतीच वृत्तपत्रात झळकली. एअर इंडियाच्या बेपत्ता महिला अधिकार्‍याला शोधण्यासाठी पोलीस अधिकारी ज्योतिषाला शरण गेले आहेत. या अधिकार्‍याचे नाव सुलक्षणा नरुला असून सहा महिन्यांपासून त्या दिल्ली येथून बेपत्ता आहेत. सुलक्षणा यांच्या मुलाने आईला शोधण्यासाठी दिल्ली परिसरात दीड-दोन लाख पत्रके वाटली.

‘हेल्प फाईंड सुलक्षणा नरुला’ नावाचे अ‍ॅपही त्याने तयार केले आहे. त्यांची माहिती देणार्‍यास कुटुंबियांनी एक लाखाचे पारितोषिक जाहीर केले आहे. बेपत्ता लोकांना शोधणे व या घटनेशी संबंधित आरोपींना शासन करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. आपले काम जबाबदारीने पार पाडण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकार्‍याने स्वत:ची व बेपत्ता महिलेची कुंडली एका ज्योतिषाला दाखवली, अशी ती बातमी आहे.

ज्योतिषानेही महिला सापडण्याचे ‘योग’ असल्याचे सांगितले म्हणे! एवढ्यावरच हा अधिकारी थांबला नाही तर त्याने ज्योतिषाने सुचवलेले सर्व पूजाविधी सुलक्षणा यांच्या कुटुंबाला करायला लावले. असे नसते उद्योग करण्याऐवजी पत्नीबरोबर काम करणार्‍या विमानतळ सेवकांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी नरुला यांच्या पतीने केली आहे. शिक्षणाने माणसाचे विचार बदलतील आणि अधिक प्रगल्भ होतील अशी समाजसुधारकांची अपेक्षा होती;

पण या प्रकरणात असे वेगळे का घडावे? बेपत्ता व्यक्ती आणि गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी ज्योतिषाचेच पाय धरले. हा शिक्षणाचा पराभव म्हणावा की माणसाच्या वैचारिक क्षमतेचा? ज्योतिषीच गुन्हेगार शोधून देणार असतील तर पोलिसांचे काम काय? मग सगळ्याच पोलीस ठाण्यांत अधिकृतरीत्या ज्योतिषी नेमायची मागणी कोणी करावी का? ज्योतिषांच्या सल्ल्याने असले प्रश्न सुटतील असे या पोलीस अधिकार्‍याला अचानक कसे वाटले?

विज्ञानातील अनेक शोध भारतीयांना पुरातन काळापासून माहीत आहेत, असे दावे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून करण्याची सध्या साथ पसरली आहे. जालंदर येथे या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेली भारतीय विज्ञान परिषद अशाच काही दाव्यांमुळे गाजली होती. हे दावे सरकारने खोडून काढल्याचे ऐकिवात तरी नाही. याबाबतीत ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका शासनाने का घेतली असावी? मग तपासासाठी ज्योतिषाचा आधार घेण्याची कृती तरी अयोग्य का मानावी? त्यासाठी पोलीस अधिकार्‍याला दोष का द्यावा? ‘घर फिरले की वासेही फिरतात’ अशी म्हण आहे. त्या अर्थाने सरकारचा दृष्टिकोन बदलल्यामुळे यंत्रणेला आपली दिशा बदलावी लागली असेल का?

LEAVE A REPLY

*