दोन्ही आरोपींच्यावतीने अ‍ॅड. मकासरे यांना काम पाहण्याचे आदेश

0
अहमदनगर (प्रितिनिधी) – कर्जत तालुक्यातील कोपर्डी खटल्यातील आरोपीचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे शनिवारी (दि.6) सुनावणीला गैरहजर होते. यावर सरकारी पक्षाने आक्षप घेतला, तर न्यायालय देखील संतप्त झाले. विधी सेवा प्राधिकरणाचे अ‍ॅड. योहान मकासरे यांनीच आरोपी दोनच्यावतीने उलट तपासणी घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मकासरे यांनी प्रथमता नकार दिला.

 

मात्र, विधी सेवा प्राधिकरणाकडून लेखी आदेश दिल्यानंतर त्यांनी जुजबी युक्तिवाद केला. शनिवारपासून अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची उलटतपासणी सुरु केली आहे. खटल्याची पुढील सुनावणी 22 व 23 तारखेला होणार आहे.
कोपर्डी प्रकरणात आरोपीचे वकील अ‍ॅड. खोपडे यापूर्वी अनेकदा सुनावणी दरम्यान गैरहजर होते. त्यामुळे ते या खटल्याची सुनावणी लांबवत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी केला. अ‍ॅड. खोपडे हे वेगवेगळी कारणे देत वारंवार सुनावनी तहकूब करायला लावत असल्याचा तीव्र आक्षेप अ‍ॅड. निकम यांनी घेतला.
यापूर्वीही अ‍ॅड. खोपडे यांच्या गैरहजरीमुळे न्यायालयाने त्यांना दंड केला आहे. तो भरण्यासही त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ या दोन्ही आरोपींच्यावतीने मकासरे यांनी काम पाहावे असे सांगण्यात आले. मात्र, मकासरे यांनी दोघांचा खटला चालविण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर कायदेशीर पत्र लिहून आरोपी दोनतर्फे अ‍ॅड. मकासरे यांनीच गवारे यांची उलटतपासणी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर अ‍ॅड. मकासरे यांनी उलटतपासणी घेतली.
नितीन भैलुमेचे वकील अ‍ॅड प्रकाश आहेर यांनीही पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची उलटपासणी सुरु केली. यात मोजकेच प्रश्न विचरण्यात आले. आरोपी भैलुमेच्या अटक आणि स्टेशन डायरीतील नोंदी या प्रश्‍नांचा त्यात समावेश होता. यानंतरचे प्रश्न नोडल अधिकार्‍यांच्या उलटतपासणीनंतर विचारु असे अ‍ॅड. आहेर यांनी सांगितले. त्यानंतर या खटल्याचे कामकाज स्थगित करण्यात आले.

पत्रकारांना सुनावणीत प्रवेश
आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी खटला सुरु असताना तेथे पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक यांना खटल्या दरम्यान आत बसता येणार नसल्याचे आदेश काढले होते. यामुळे खटल्याचे वृतांकन करतांना पत्रकारांना त्रासाला समोरे जावे लागत होते. अखेर प्रेसक्लब यांचावतीने अ‍ॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायालयाने काही पत्रकारांना सुनावणी दरम्यान न्यायालयात बसण्याचे आदेश दिले आहेत.

हा केवळ वेळकाढूपणा
अ‍ॅड. खोपडे न्यायालयात अनुपस्थित होते. तसा अर्ज आरोपीच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आला होता. उलटतपासणी घेण्यापूर्वी घटनास्थळ पाहायचे आहे. मात्र, पोलिस अधीक्षक रजेवर असल्यामुळे आपल्याला सरंक्षण मिळू शकले नाही. तसेच घटनास्थळ पाहिल्याशिवाय उलटतपासणी घेऊ शकत नाही, असे अर्जात म्हटलेले होते. मात्र, घटनास्थळ पाहण्यासाठी न्यायालयाने त्यांना परवानगी दिली नाही. तसे आदेश देखील झाले नाहीत. हा केवळ वेळकाढूपणा आहे. अस आरोप अ‍ॅड. निकम यांनी केला.

LEAVE A REPLY

*