देशदूत जागतिक महिला दिन विशेष पुरवणी

0

आजची स्त्री २१ व्या शतकातील मुक्त आणि सशक्त व्यक्तिमत्त्व आहे. ती कायम मुक्तीची आस घेऊन सोशिक जीवन जगणारीही आहे. स्त्रीमुक्तीचे लोण आता सगळीकडे पसरले आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रिया स्वतःच्या सर्व कल्पना अस्तित्वात आणणार्‍या, आयुष्याच्या वाटा बदलणार्‍या आणि आकाशालाही गवसणी घालायला उत्सुक असणार्‍या अशा स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या आहेत.

पहिल्यापासून स्त्री सामान्य नव्हती याला इतिहास साक्षीदार आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलेे, मदर तेरेसा, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ही काही उदाहरणे आहेत. त्यांनी त्यांचे असामान्यत्व सतत जोपासले आणि वाढवलेही आहे. जगाला बदलवण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. तिला फक्त समाजाच्या पाठबळाची गरज आहे.

पूर्वीच्या काळी चूल आणि मूल यापुरतीच तीची मर्यादा होती. पुरुषाची सहचरिणी म्हणून वावरताना घर, संसार, मूल, नातीगोती हे सर्व स्त्रीचीच जबाबदारी होती. परिणामी भोगायचे ते फक्त स्त्रीनेच. त्यामुळेच तिची शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक कुचंबणा होत आली आहे. आजही तिच्या या स्थितीत फारसा फरक झालेला नाही. तथाकथित शिक्षित, पुरोगामी समाज व अत्याधुनिक सोयी, सवलती असूनसुद्धा महिलांना मुक्तता कधीच मिळालेली नाही. मुले व मुलींसाठीही प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत आहे;

पण प्रामुख्याने ग्रामीण भागात मुलींना आईला घरकामात मदत, भावंड सांभाळण्याची जबाबदारी यामुळे शिक्षणापासून वंंचित राहावे लागत आहे. मध्यमवर्गीय समाजातही शिक्षणाबाबतीत मुलीला दुय्यम स्थानच आहे. अशा सर्व सामाजिक परिस्थितीत स्त्रिया झगडतायेत, स्वत:ला शिक्षित करून घेण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी, आपल्या परीने उपलब्ध शासनमान्य सोयीसवलतींची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या आव्हानाला पेलण्यासाठी मुलींना पालक, शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी मदत करण्याची गरज आहे. खेड्यापाड्यांमध्ये अनेक मुली साक्षर होत आहेत. परंतु त्या उच्चशिक्षित होऊ शकत नाहीत.

लहान वयात होणारे लग्न, विविध समाजात असणार्‍या प्रथा, परंपरा यांची जोखड त्यांच्या मानगुटीवर आहे. हे झुगारून देण्यासाठी त्यांना समाजाच्या पाठबळाचीच गरज आहे. माझ्यासारख्या एका आदिवासी मुलीला केवळ एक गुरू मिळाल्यामुळे व त्यांनी आई-वडिलांच्या मनात बदल घडवल्यामुळे मला पुढे येता आले अन्यथा माझी स्थितीही माझ्या इतर आदिवासी भगिनींप्रमाणेच झाली असती. अशा अनेक कविता राऊत दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आहेत. त्यांना शोधण्यासाठी आदिवासी भाग, खेडोपाडी टॅलेंट सर्च शिबिर घेऊन पुढे आणण्याची गरज आहे. या समाजाच्या सहकार्याची, आधाराची गरज आहे.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजा समोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा होत आहे14 15

LEAVE A REPLY

*