देवीदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर; 15 संचालकांचे अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान

0

पंचवटी । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान 15 संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत त्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, आज झालेल्या विशेष सभेत उपस्थित 16 संचालकांपैकी 15 संचालकांनी पिंगळे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल.
गत आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान 15 संचालकांनी सभापती देवीदास पिंगळे यांची कारकीर्द वादग्रस्त असून यामुळे बाजार समिती बदनाम होत आहे. तसेच शेतकरी हिताला बाधा पोहोचत असल्याचे सांगत पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सभेची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बहुतांश संचालक हे अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याच्या शक्यतेने देवीदास पिंगळे यांनी 1 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. या पार्श्वभूमीवर आज होणार्‍या विशेष बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रांताधिकारी अमोल हेडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यात पीठासन अधिकारी म्हणून कामकाज करताना अमोल हेडगे यांनी देवीदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाबाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र पिंगळे यांनी 1 जुलै रोजी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा दिला असल्याने मतदान घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. यावर संचालक शिवाजी चुंभळे यांनी यापूर्वीदेखील बाजार समितीच्या कामाकाजादरम्यान असा प्रसंग आला होता. तेव्हा मतदान घेण्यात आल्याचे स्पष्ट करताना अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली. यास सर्व संचालकांनी अनुमोदन दिल्याने पीठासन अधिकारी अमोल हेडगे यांनी अविश्वास ठरावावर मतदान घेतले. यावेळी 18 संचालकांपैकी प्रभारी सभापती शामराव गावित, शिवाजी चुंभळे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, शंकर धनवटे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, दिलीप थेटे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, संदीप पाटील, विमल जुंद्रे आदी 16 संचालक उपस्थित होते. यातील प्रभाकर मुळाणे वगळता इतर 15 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर संचालक ताराबाई माळेकर या विशेष बैठकीस उशिराने आल्याने त्यांना या प्रकियेत सहभागी होता आले नाही.

LEAVE A REPLY

*