Type to search

अग्रलेख संपादकीय

देवस्थानांचा कारभार कसा बदलेल?

Share
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ठेवी 12 हजार कोटींवर पोहोचल्या असून या ठेवींपोटी देवस्थानला वर्षाला 845 कोटी व्याज मिळते अशी माहिती देवस्थानच्या अधिकार्‍याने दिली आहे. देवस्थानचे वार्षिक उत्पन्न सुमारे 31 अब्ज आहे. देवस्थानकडे 550 किलो सोन्याचे दागिने असून 8.7 टन शुद्ध स्वरुपातील सोने आहे. वर्षाला अडीच कोटींपेक्षा जास्त भाविक तिरुपतीला भेट देतात.

तिरुपतीसह देशातील अनेक देवस्थाने श्रीमंत आहेत. पद्मनाभस्वामी मंदिर, शिर्डी, मुंबईचे सिद्धीविनायक, वैष्णोदेवी ही याची वानगीदाखलची उदाहरणे आहेत. प्रत्येक देवस्थानांच्या स्वत:च्या विश्वस्त संस्था आहेत. बहुतेक देवस्थानांचा कारभार गेली अनेक वर्षे वादाच्या भोवर्‍यात आहे. विश्वस्तांच्या नेमणुका, सेवकवर्गाच्या नियुक्त्या, देवस्थानांकडे जमा होणारा निधी आणि त्याचा विनियोग, पदाधिकारी आणि सेवकांची मनमानी, देवस्थानांचे नियम, बनावट स्वाक्षर्‍या अशा अनेक मुद्यांवरून देवस्थानांचे कारभार चर्चेत असतात.

देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित होतात असे नेहमीच बोलले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांची 16 हजार एकर जमीन कुठे गेली हे शोधावे लागणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या उपाध्यक्षांनी दिली होती. देवस्थानांतर्फे चालवले जाणारे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय असले तरी कारभारात मात्र पारदर्शकता नाही हे वास्तव आहे. सद्यस्थितीत देवस्थानांवरील नेमणुकांसाठी राजकीय पुढार्‍यांमध्ये चढाओढ सुरू असते. यामागचे इंगित जनतेला माहीत आहे. सरकारने ठरवले तर ही परिस्थिती बदलू शकेल.

देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकता आणता येईल. देशातील सर्वच देवस्थानांची स्वतंत्र विश्वस्त संस्था असेल. या संस्थेवर राजकीय व्यक्तींची विश्वस्त म्हणून नेमणूक करता येणार नाही. देवस्थानांकडील सोने सरकारकडे जमा होईल. देवस्थानांच्या कारभाराचे प्रमुख जिल्हाधिकारी असतील. देवस्थानांकडे जमा होणारा निधी रोजच्या रोज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला जाईल.

जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार वेतन आणि इतर भत्ते दिले जावेत असे सरकार ठरवू शकेल. सरकारी निर्णयाची अंमलबजावणी केंद्रीय विश्वस्त संस्थेला बंधनकारक असेल. हे बदल करण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय किंमत मोजायची तयारी सरकारला दाखवावी लागेल. सरकार तशी ती दाखवेल का, हा कळीचा प्रश्न आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!