देवळाली पालिकेला द्वितीय क्रमांकाचे 2 कोटीचे बक्षीस

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी)- नगर विकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्टपणे काम करणार्‍या नगरपरिषदांपैकी देवळाली पालिकेस द्वितीय क्रमांकाचे 2 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. आज गुरुवार दि. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता पारितोषिकाचे वितरण होणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने 20 एप्रिल हा दिवस नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने राज्यातील अ, ब, क, वर्गातील नगरपालिकांनी उत्कृष्ट काम करण्यासंदर्भात स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले होते. त्यानुसार नगरपालिकांनी उत्कृष्ट काम करणार्‍या नगर परिषदांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा निकाल दि. 2 मे रोजी जाहीर करण्यात आला.
त्यानुसार नगर विकास खात्याचे अवर सचिव ज.ना. पाटील व नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त विजय कुलकर्णी यांनी पत्राद्वारे नगरपरिषदेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये ब वर्ग नगरपालिकेमध्ये नाशिक विभागातून शिरपूर-वाघाडे नगरपरिषदेला प्रथम क्रमांक, संगमनेर नगरपरिषद द्वितीय तर क वर्ग नगरपरिषदेमधून त्र्यंबकेश्‍वर नगर परिषद प्रथम क्रमांक व देवळाली प्रवरा नगरपालिकेला द्वितीय क्रमांक अशी निवड करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेस राज्यातील उत्कृष्ट काम करणार्‍या नगरपरिषदांपैकी द्वितीय क्रमांकाचे 2 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी कामगारांची बैठक घेऊन या बक्षिसाचे मानकरी सर्व कामगार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार्‍या पारितोषिक वितरण सोहळ्यास नगराध्यक्ष कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, बन्सी वाळके, सुरेश मोटे, आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*