Type to search

धुळे

देवभाने धरण ‘ओव्हर फ्लो’

Share

कापडणे | पावसाळ्याच्या उत्तरार्धात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे भात नदीवरील देवभाने धरण आज दि.९ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरले आहे. सहा वर्षानंतर शंभरी गाठत हे धरण ओव्हर फ्लो झाले. धरण तुडुंब भरल्याने भात नदी वाहती झाली, सोनवद प्रकल्प भरण्यासाठी याची मदत होणार आहे. गेल्या वीस वर्षात हे धरण केवळ तीसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे.

भात नदीवरील, देवभाने या लघु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण ओसंडुन वाहु लागले. तीसगाव, ढंढाणे, वडेल, देवभाने आदी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण आज दुपारी पूर्ण क्षमतेने भरले व नदीपात्रातून विसर्ग सुरु झाला. यामुळे देवभाने, कापडणे, धनुर- लोणकुटे परिसरातील बंधारेही भरण्यास मदत होणार असुन, सोनवद प्रकल्पासाठी नदीचा हा प्रवाह उपयुक्त ठरणार आहे. सोनवद प्रकल्प भरण्यासाठी पांझरेतून १५ कि.मी.ची पाटचारी करण्यात आली आहे. २५० घन मिटर प्रतिसेकंद जलक्षमता असलेली ही पाटचारी सद्या सुरु असली तरी भात नदीमुळे हा प्रकल्प भरण्यास मदत होणार आहे.

देवभाने लघु प्रकल्पाच्या कामास दि.२८ ऑगष्ट १९७१ रोजी प्रारंभ झाल्यानंतर सुमारे चार वर्षात सदरचे काम पूर्णत्वास आले. या दिवसापासून हा लघु प्रकल्प केवळ आठव्यांदा भरत आहे. गेल्या वीस वर्षात धरण पूर्ण भरण्याची ही तीसरीच वेळ आहे. सन १९९८ मध्ये तसेच त्यापूर्वी चार वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले तर गेल्या वीस वर्षात २००६, २०१३ व यावर्षी हा लघु प्रकल्प शंभर टक्के भरला. तब्बल २.३१ एम.क्यूम. जलक्षमता असलेले हे धरण कापडणे, देवभाने, सायने, नंदाणे, धमाणे, धनुर, सरवड, लोणकुटे गावांसाठी महत्वाचे मानले जाते. बर्‍याच गावांसाठी हा प्रकल्प पिण्यासाठी राखीव ठेवला जात असुन  टंचाईच्या काळात या गावांना येथुन पुरवठा केला जातो. या धरणामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या रब्बीच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या चार वर्षापासुनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे धरणेही आटली व पाण्याची पातळीही खाली गेली अशा दुहेरी संकटात गावे सापडली होती.

कापडण्याच्या इतिहासात पहिल्यांदा टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. देवभाने लघु प्रकल्प व सोनवद प्रकल्प कोरडेठाक पडल्याने येथे मोठी पाणीकोंडी झाली होती, आता या धरणांमध्ये पाणी आल्याने पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हा लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने परिसरातुन मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

सोनवद भरण्याची प्रतिक्षाच -सर्वच प्रकल्प, धरणे व बंधारे ओसंडुन वाहत असतांना सोनवद भरण्याची मात्र प्रतीक्षा कायम आहे. १४.३६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण गेल्या ५ वर्षापासुन तहानलेलेच आहे. आजच्या तारखेला सोनवद प्रकल्प केवळ ३६ टक्केच भरल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची चिंता कायम आहे. देवभाने लघु प्रकल्प भरल्याने, भात नदीला आता एक-दोन पुर आल्यास हे धरण भरण्यास मदत होऊ शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!