‘दुष्मनी जम कर करो, लेकिन…’

0
भारताचे पंतप्रधान शब्दच्छलापेक्षा गळाभेटीवर विश्वास ठेवतात. प्रश्न काश्मीरमधील नागरिकांचा असो वा काश्मीरच्या एका भागावर कब्जा करणार्‍या पाकचा, शांततेच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटावेत असाच भारताचा प्रयत्न राहिला आहे. पाकचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवून आणि चांगल्या संबंधांबद्दल कटिबद्धता प्रकट करून मोदींनी या दिशेने पाऊल टाकले आहे. दोन्ही नेत्यांच्या दूरध्वनीवरील चर्चेत भारतीय उपमहाद्वीपात शांतता, सुरक्षा आणि समृद्धीच्या समान स्वप्नाबद्दल भाष्य केले गेले. त्याकडेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात पाक पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

‘आपण मित्र निवडू शकतो; पण शेजारी नव्हे!’ असे परखड विधान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. शेजारी नेहमी शेजारीच राहील, मात्र शेजार्‍याशी नाते टिकवण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंवर येते. शेजार्‍यांविषयीचे हे मतप्रदर्शन अटलजींनी भारत-पाक संबंधात केले होते. तेव्हा ते भारताचे पंतप्रधान होते. मैत्री आणि बंधुभावाचा संदेश घेऊन अटलजी बसने पाकिस्तानात गेले होते. भारताच्या या अभूतपूर्व प्रयत्नाचे उत्तर पाकने कारगिलवर हल्लाबोल करून दिले होते हे दुर्दैव! त्यामुळे अटलजी दु:खी झाले होते; पण निराश नव्हे! दोन्ही देशांचे परस्पर संबंध सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी चालूच ठेवला. कारगिलनंतरदेखील पाक राष्ट्रपतींना त्यांनी चर्चेसाठी आग्र्याला आमंत्रित केले. पाकच्या हेकटपणामुळे आग्र्याची शिखर बैठक यशस्वी होऊ शकली नाही; पण संबंध सुधारण्याचे प्रयत्न चालूच राहायला हवेत ही बाब मात्र अधोरेखित झाली.

तेव्हापासूून आतापर्यंत गंगा आणि झेलममधून बरेच पाणी वाहून गेले आहे. दहशतवादाला खतपाणी घालून आणि भारतीय सीमेवर आक्रमण करून पाकिस्तान सातत्याने हटवादीपणाचा प्रत्यय देत राहिला आहे. भारतीय सैन्य पाकच्या कारवायांना नेहमीच मुँहतोड जबाब देते आले आहे. आजही देते. मात्र ‘युद्ध हे आपल्या प्रश्नांचे उत्तर नाही’ याची जाणीव दोन्ही देशांना आहे. युद्ध कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. म्हणूनच भारतात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तारूढ झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारी देशांच्या सत्ताप्रमुखांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांतील सर्व सत्ताप्रमुखांनी आमंत्रणाचा स्वीकार केला होता.

पाक पंतप्रधानांना निमंत्रित करण्याच्या मोदींच्या भूमिकेची तुलना अटलजींच्या पाक बसयात्रेशी केली गेली होती. संबंध सुधारण्याचे मोदींचे प्रयत्न थांबले नाहीत. पाक पंतप्रधानांच्या वाढदिवशी अचानक पाकला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. सैनिकी कारवाई हे समस्यांचे उत्तर नाही हा त्यामागील स्पष्ट संदेश होता. तरीसुद्धा खोड्या काढणे थांबवायला पाक तयार नाही. दहशतवादी हल्ले चालूच राहिले आणि सीमांवरील घुसखोरीसुद्धा! तथापि युद्ध हे कोणत्याही समस्येचे उत्तर नसते, हेही तितकेच खरे! चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे भारताचे धोरण कमकुवतपणा समजू नये, हेही भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे. शांतता ही भारत आणि पाक यांची समान गरज आहे. वाजपेयी ते जाणून होते. मोदींनीही ते आता जाणले असावे. नरसिंहराव यांच्या शासन काळात अटलजी विरोधी पक्षात होते. त्यावेळी पंतप्रधानांनी एका वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते अटलजी यांच्याकडे पाठवले होते. भारत-पाक संबंधांच्या वर्तमान स्थितीबद्दल त्या अधिकार्‍याला माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता.

अटलजींनी दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या धोरणाचे समर्थन आवर्जून केले. मात्र यासंदर्भात एखादा प्रस्ताव पाकपुढे ठेवायचा असल्यास ‘तो आमच्या कमकुवतपणाचा संकेत आहे असे वाटता कामा नये’, असेही त्यांनी बजावले होते. थोडक्यात भारतातील प्रत्येक सरकारने हेच धोरण अवलंबले आहे. कारगिल युद्धानंतरच्या आग्रा शिखर बैठकीतसुद्धा ‘शांतता चर्चा हा भारताचा कमकुवतपणा नसून दोन्ही देशांची गरज आहे’ हेच स्पष्ट झाले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारसुद्धा पाकच्या नेभळट कृत्यांनंतरही याच धोरणानुसार पुढे जाऊ इच्छिते. पाकच का? चीनबाबतही भारताने हेच धोरण अवलंबले आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदी चिनी पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झुलत होते तेव्हा चिनी सैन्याने सीमेवर घुसखोरीची आगळीक केली होती. तरीसुद्धा चर्चेचे धोरण भारताने सोडले नाही.

भारताचे पंतप्रधान शब्दच्छलापेक्षा गळाभेटीवर विश्वास ठेवतात. प्रश्न काश्मीरमधील नागरिकांचा असो वा काश्मीरच्या एका भागावर कब्जा करणार्‍या पाकचा, शांततेच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटावेत असाच भारताचा प्रयत्न राहिला आहे. पाकचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवून आणि चांगल्या संबंधांबद्दल कटिबद्धता प्रकट करून मोदींनी या दिशेने पाऊल टाकले आहे. दोन्ही नेत्यांच्या दूरध्वनीवरील चर्चेत भारतीय उपमहाद्वीपात शांतता, सुरक्षा आणि समृद्धीच्या समान स्वप्नाबद्दल भाष्य केले गेले.

त्याकडेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात पाक पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. ‘अर्थपूर्ण आणि सकारात्मक कार्यवाही’बद्दलचा मुद्दाही नमूद केला आहे. पंतप्रधानांच्या या पुढाकारामुळे दोन्ही देशांत चर्चेची शक्यता पाकच्या नव्या विदेशमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही देशांदरम्यान चर्चेचा मार्ग स्वीकारण्याच्या दृष्टिकोनाला देशातील काही लोकांचा आक्षेप आहे. भारतीय सैन्यावर पाक सैन्याकडून गोळीबार होत असताना भारतीय पंतप्रधानांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवणे हा भारताचा कमकुवतपणा वाटण्याचा संभव आहे, असे काहीजणांना वाटते. मात्र हा प्रकार ‘राईचा पर्वत’ करण्यासारखाच आहे. सीमांचे रक्षण करण्यास आणि सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेण्यास भारत सक्षम आहे. पाकचे आतापर्यंतचे सर्व आक्रमणकारी प्रयत्न भारताने उधळून लावले आहेत. अशा स्थितीत भारतीय पंतप्रधानांनी स्वीकारलेली ‘सकारात्मक कार्यवाही’ची भूमिका हा देशाचा कमकुवतपणा नसून देशाची ताकद आणि नेकपणाचाच संकेत आहे. पाकचे विदेशमंत्री याला चर्चेच्या इच्छेचा संकेत मानत असतील तर त्याकडे संशयी नजरेने पाहिले जाऊ नये. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी प्रत्येक संधी आणि प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत करायला हवे.

तथापि पाकचा यासंदर्भातील आतापर्यंतचा इतिहास निराशाजनकच आहे; पण चूक सुधारण्याच्या इच्छेची शक्यता का नाकारावी? पाक विदेशमंत्र्यांच्या शब्दांवर विरोध प्रकट करणेदेखील ‘राईचा पर्वत’ करण्यासारखेच आहे. इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित राहिले. त्यावरून अकारण कोलाहल माजला. तसाच हाही प्रकार आहे. पाक सेनापतींची गळाभेट घेणे सिद्धूंच्या अतिउत्साहाचा परिणाम असू शकतो; पण त्याला गुन्हा ठरवून आपल्या पंतप्रधानांच्या गळाभेटीच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे होईल. तरीही ‘जरा फासले से मिला करो’च्या बशीर बद्र यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीच्या सल्ल्याचे वेगळे महत्त्व आहे; पण ‘दुश्मनी जम कर करो, लेकिन यह गुंजाईश रहे। फिर कभी हम दोस्त बन जाएं तो शर्मिंदा न हो।’ असेही ते म्हणाले होते. ही गोष्ट भारतापेक्षा पाकिस्तानला समजून घ्यायची आहे. सोबत जगण्याखेरीज शेजार्‍यांना दुसरा पर्याय नाही, हेही समजून घ्यावे लागेल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)
– विश्वनाथ सचदेव

LEAVE A REPLY

*