Type to search

ब्लॉग

दुष्परिणाम कसे रोखणार?

Share
प्रदूषण आणि हवामानबदलाचे दुष्परिणाम जगभर मोठ्याप्रमाणात दिसत असून ठिकठिकाणच्या भयावह घटनांमुळे मानवी जीवन धोक्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी विविध देश वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही हे प्रयत्न अपुरे असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या प्रयत्नांचे आणि एकूणच उपाययोजनांचे आव्हान जगापुढे आहे.

थायलंड हा प्रामुख्याने पर्यटनासाठी ओळखला जाणारा देश आहे. मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत इथल्या मॅनग्रुव्हच्या जंगलासाठीही तो ओळखला जात होता. अलीकडे मात्र ही जंगले हळूहळू नष्ट होत चालल्याचे आणि त्यामुळे समुद्राचे पाणी काठांवरच्या गावांमध्ये घुसू लागल्याचे विदारक सत्य समोर येत चालले आहे. अशाच प्रकारची समस्या प्रदर्शित करणारे आणखी एक गाव म्हणजे सामूत चीन. हे गाव बँकॉकपासून जवळच आहे. या गावातल्या एका तरंगत्या मंदिराकडे सध्या पर्यटकांचे लक्ष वेधले जात आहे आणि त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या एकमेव छोट्या लाकडी मार्गावरून लोक या मंदिरात जाऊ लागले आहेत. मात्र ही फारशी समाधानाची बाब नाहीच, तर पर्यावरणाची हानी काय करू शकते आणि अख्खे गाव समुद्राच्या पोटात कसे गडप होऊ शकते याचे हे गाव म्हणजे जिवंत उदाहरण आहे. जे मंदिर पूर्वी म्हणजे जेमतेम तीस वर्षांपूर्वी या गावाच्या मध्यभागी होते. ते आता तरंगते मंदिर बनले आहे. याचा अर्थ शेजारचे संपूर्ण गाव समुद्राच्या पोटात गेले आहे.

समुद्राचे पाणी मंदिराभोवती हळूहळू वाढू लागल्यावर या गावातले मंदिराभोवती राहणारे लोक दूर निघून गेले. मात्र या मंदिराचा थाई पुजारी सोमन्यूक अ‍ॅटिपॅनिओने तिथून जाण्यास नकार दिला आणि अद्यापही तो तिथेच आहे. हे मंदिरही समुद्रात कधी गडप होईल याविषयी पर्यावरणतज्ञ निश्चितपणे काहीही सांगू शकत नाहीत. तरीही देशाच्या झपाट्याने धूप होत चाललेल्या किनारपट्टीची धूप वाचवण्याच्या लढ्याचे प्रतीक म्हणून या तरंगत्या मंदिराकडे पाहिले जात आहे. कारण आता या गावाची ही उरलीसुरली खूण वाचवण्यासाठी उशिरा का होईना, मॅनग्रुव्हची लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हवामानातले बदल, औद्योगिक शेती आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यांच्या संयोगातून थायलंडच्या किनारपट्ट्यांचे प्रदेश धोक्यात येत आहेत. किनारपट्टीलगतच्या जमिनीची धूप होत असल्यामुळे मॅनग्रुव्हची मौल्यवान झाडे नष्ट होत चालली आहेत आणि सामूत चीनमध्ये सध्या फक्त सागरी पाण्याने वेढलेल्या अवस्थेतल्या काही इमारतीच तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. सुमारे 30 वर्षांपूर्वी पाणी किनारपट्टीतून पुढे घुसण्यास सुरुवात झाल्यापासून सामूत चीन या खेड्यातले मासेमारी करणारे बहुतेक ग्रामस्थ शेकडो मीटर लांब गेले आणि आज त्यांनी मूळ गावापासून दूरवर लाकडी घरे बांधली आहेत. तरंगत्या मंदिराचा हा पुजारी सध्या 51 वर्षांचा आहे. पूर्वी जिथे शाळा होती ती जागाही तो पर्यटकांना दूरवरच्या समुद्राच्या दिशेने दाखवतो. सामूत चिन हे बँकॉकच्या दक्षिणेला बँकॉकपासून जेमतेम एखाद्या तासाच्या अंतरावरचे गाव आहे. साहजिकच थायलंडच्या अनेक शहरांना धोका निर्माण होत चालल्याचे प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिले जात आहे. एकेकाळी थायलंडच्या किनारपट्ट्या मॅनग्रुव्हच्या दाट जंगलांनी संरक्षित होत्या. परंतु ही जंगले वाढत्या लोकसंख्येच्या गरजांसाठी तोडण्यात आली आणि समुद्राच्या पाण्याने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. शिंपल्यांच्या पैदाशीसाठी आणि मीठ तयार करण्यासाठी मॅनग्रुव्हची तोड करण्यात आली.

थायलंडच्या डिपार्टमेंट ऑफ मरीन अ‍ॅण्ड कोस्टल रिसोर्सेसच्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या एनव्हायर्न्मेंट प्रोग्रामच्या अहवालानुसार 1961 ते 2000 दरम्यान थायलंडच्या विशाल सागरी किनारपट्टीवरून एक तृतीयांश मॅनग्रुव्हची तोड करण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे सागरी लाटांचा जोर वाढला असून मान्सूनचा प्रचंड पाऊसही कोसळू लागला. त्यामुळेही थायलंडच्या किनारपट्टीच्या प्रदेशांमधल्या मॅनग्रुव्हचा नाश झाला. आता समुद्रात जोरदार लाटा उसळत असून भरतीचाही जोर मोठा असतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. अर्थातच त्यामुळे जमिनीची मोठ्याप्रमाणात धूप होत आहे. किनारपट्टीची धूप झाल्यामुळे आशियाई आणि इराण व रशिया यांच्या दरम्यानच्या कॅस्पियन किनारपट्ट्यांवर सर्वाधिक विपरीत परिणाम होत आहे. ‘नेचर’ या जर्नलमध्ये यासंदर्भातील अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, किनारपट्ट्यांची धूप ही जागतिक समस्या असून तिच्यामुळे 1984 ते 2015 या कालावधीत आपण हजारो चौरस किलोमीटरची भूमी गमावली आहे. याचा अर्थ हैतीएवढा भूभाग नष्ट झाला आहे. थायलंडमध्ये देशाच्या एक चतुर्थांश किंवा 700 किलोमीटरच्या भागाची गंभीर धूप होत आहे.

सध्या थायलंडमधल्या मौल्यवान मॅनग्रुव्हचे संरक्षण करून त्यांची पुनर्लागवड करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. त्यात सॉम्यन्यूक बेटाच्या जवळच्या भागाचाही समावेश आहे. अलीकडेच शेकडो लोकांनी तिथे छातीएवढ्या पाण्यात जाऊन मॅनग्रुव्हच्या रोपांचे रोपण केले. या मोहिमेचे नाव ‘प्लांटिंग अ फॉरेस्ट इन पीपल्स हार्टस्’ असे समर्पक ठेवण्यात आले आहे. मात्र प्रदूषण आणि पर्यावरण हे विषय फक्त थायलंडपुरतेच मर्यादित नाहीत. असेच भयावह परिणाम जगभर ठिकठिकाणी दिसून येत आहेत आणि त्याला जगातली अव्वल क्रमांकाची महासत्ता असलेली अमेरिकाही अपवाद नाही.

अमेरिकेतल्या गगनचुंबी इमारतींवर आदळल्यामुळे किमान 10 कोटी आणि कमाल एक अब्जापर्यंतचे पक्षी दरवर्षी अमेरिकेत मरण पावतात. विशेषतः काचेचे आच्छादन असलेल्या आणि चकाकत्या इमारतींवर आदळणारे पक्षी यात मृत्यूला कवटाळतात. शिकागोतील विमानतळावरील इमारतींना शोभेसाठी लावण्यात आलेल्या वस्तूंचे अनेक टोकदार काचेचे तुकडे पक्ष्यांच्या शरीरात घुसतात आणि ते मरण पावतात. स्थलांतरित पक्ष्यांना धोकादायक असलेल्या शहरांचा अभ्यास करणार्‍या कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजीने हा अभ्यास नुकताच प्रकाशित केला आहे. या अभ्यासानुसार, किमान 250 प्रजातींचे कोट्यवधी पक्षी शिकागोमध्ये दरवर्षी शिशिर आणि वसंत ऋतूच्या काळात येतात. ते वर्षातून दोनदा हजारो मैलांचा प्रवास करून तिथे येतात. वसंत ऋतूत ते मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून उत्तरेकडे कॅनडातील ग्रेट लेक्सकडे जातात आणि फॉलच्या दरम्यान पुन्हा परततात. मॅनहॅटनमधील प्रसिद्ध स्कायलाईन हा या पक्ष्यांसाठीचा आणखी एक मृत्यूचा सापळा आहे. विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांसाठी तो आहेच. स्थलांतरित पक्षी नवीन ठिकाणी रात्री कुठेतरी स्कायलाईनसारख्या ठिकाणी आश्रयाला राहतात.

दिवसा प्रकाश पडला की ते अन्नाच्या शोधार्थ उडू लागतात. त्यांना एखादे झाड दिसते आणि त्याच्या दिशेने ते उडतात. मात्र प्रत्यक्षात ते काही इमारतींच्या काचांमध्ये उमटलेले झाडाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे ते त्या काचांवर धडकतात आणि मरण पावतात. पक्षी अभ्यासकांच्या मते शिकागो, न्यूयॉर्क आणि लॉस अँजेलिस ही तीन शहरे स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. निसर्गाच्या जीवनसाखळीत पशू, पक्षी, वनस्पती, झाडे आणि माणूस हे सगळेच सजीव घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही एखाद्या घटकाला निर्माण झालेला धोका संपूर्ण सजीवसृष्टीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यादृष्टीने मॅनग्रुव्हची किंवा जंगलांची तोड आणि पक्ष्यांचे मृत्यू या दोन्ही घटनांकडे पाहणे आवश्यक आहे. निसर्गाचे रक्षण करणे आणि प्रदूषणाला आळा घालणे ही गोष्ट सध्या मानवी जीवनाच्या दृष्टीनेही किती आवश्यक बनली आहे त्याचे गांभीर्य या घटना दर्शवतात.
– अभय देशपांडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!