Type to search

दुष्काळ भीषण; पण लक्ष भलतीकडे!

अग्रलेख संपादकीय

दुष्काळ भीषण; पण लक्ष भलतीकडे!

Share
दुष्काळ दाटला आहे. तापमानाने परत चाळिशी गाठली आहे. राज्यातील हजारो गावे व लक्षावधी माणसे पाण्यासाठी तडफडत आहेत. चारा-पाण्याअभावी पाळीव पशूंचे जीवन धोक्यात आहे. दुष्काळाचे चटके सर्वत्र बसत असले तरी राज्य सरकारी निकषांच्या चौकटीत दीडशेच तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत. दु

ष्काळ जाहीर केल्यावर दिल्या जाणार्‍या सोयी-सवलती लगेचच लागू होतील असेही सरकारकडून सांगण्यात आले. पाणी टँकर, चारा छावण्या, सरकारी व बँक वसुलीला स्थगिती, रोहयो कामे आदी गोष्टींना प्राधान्य दिल्याचे जबाबदार मंत्री पुन:पुन्हा सांगत आहेत. पालकमंत्री व पालक सचिवांना जिल्हा दौर्‍यांचे आदेश दिले गेले आहेत. दुष्काळ आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर बैठकांवर बैठका चालू आहेत.

मंत्रालयात मुख्यमंत्री ‘ऑडिओ ब्रीज’ प्रणालीद्वारे रोज एका जिल्ह्यातील अधिकारी, सरपंच आदींशी संवाद साधत आहेत. त्यांना योग्य वाटतात ते निर्देश देत आहेत. तरीसुद्धा दुष्काळाला तोंड द्यायला या सर्व सोपस्कारांचा किती उपयोग होतो? राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात दुष्काळ दौरा सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या अडचणींचा पाढा ऐकून घेत आहेत.

परवा बीड जिल्हा दौर्‍यात त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. ‘यंदाच्या दुष्काळाची तीव्रता 1972 च्या दुष्काळापेक्षा जास्त आहे. मात्र दुष्काळ निवारणात सरकार अपयशी ठरले आहे’ अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. ‘राजकीय भाष्य’ म्हणून सरकारमधील धुरिणांकडून पवारांच्या या प्रतिक्रियेची संभावना केली जाईल; पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलेल का? दुष्काळप्रश्नी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने तिची गंभीर दखल घेतली. दुष्काळ निवारणासाठी कोणकोणते उपाय केले त्याची माहिती द्या;

अन्यथा आम्ही योग्य ते आदेश देऊ’ असा इशारा न्यायालयाने सरकारला दिला आहे. पवार यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेला न्यायालयाकडून जणू दुजोराच दिला गेला आहे. दुष्काळाची तीव्रता पाहता सरकारी यंत्रणा ज्या वेगाने हालायला हवी तेवढे गांभीर्य यंत्रणेतील सेवकांत तर नाहीच; पण अधिकार्‍यांतही आढळत नाही. शासन यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा इतका विदारक अनुभव यापूर्वी जनतेने क्वचितच अनुभवला.

मात्र या भीषण स्थितीतही संबंधितांचे लक्ष झालेल्या व होणार्‍या निवडणुकांवरच केंद्रित झाले असावे हेच का मराठी जनतेचे भाग्य? मंत्री व अधिकार्‍यांनी दुष्काळी दौरे कमी केले तरी चालेल; पण दुष्काळाशी रोज सामना करणार्‍या मराठी जनतेला दिलासा देणारी खंबीर पावले तातडीने उचलण्याची गरज आहे. अनुत्पादक दौर्‍यांना लोक कंटाळले तर मंत्र्यांचे दौरेही धोक्यात येतील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!