दुबार पेरणीच्या संकटग्रस्तांना मदत द्यावी ः काळे

0

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यात जून महिन्यात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हवामान खात्याकडून यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे वारंवार सांगितले जात होते.

 

 

या भरवशावर कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसावर उधार उसनवार करून आपल्या शेतात पेरणी केली होती. परंतु मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघड दिल्यामुळे पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकल्या असून संपूर्ण पेरणी केलेले क्षेत्र जळून चालले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शासनाने कृषी विभागाची यंत्रणा वापरून या परिस्थितीचा आढावा घ्यावा व दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकर्‍यांना मदत करावी. अशी मागणी युवा नेते आशुतोष काळे यांनी शासनाकडे केली आहे. त्याविषयी त्यांनी तहसीलदार किशोर कदम यांच्याशी चर्चा केली.

 

 

कोपरगाव तालुक्यात अल्पशा पावसावर शेतकर्‍यांनी सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. शेतकर्‍यांच्या मागे सुरू असलेले दृष्टचक्र संपण्याचे नाव घेत नाही. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नसताना पाऊस दडी मारून बसल्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना शासनाने दुबार पेरणीसाठी मदतीचा हात द्यावा.

 

 

शासनाला कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती कथन करावी व शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी. आमची मागणी आपण शासनाकडे पाठवून दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे सांगितले.

 

 

यावेळी पंचायत समितीच्या सभापती अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. विमलताई आगवन, सौ. सोनालीताई साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अर्जुनराव काळे, श्रावण आसने, सौ. पूर्णिमा जगधने, कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नवाज कुरेशी, निखील डांगे, हिरामण कहार, अजीज शेख, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, कृष्णा आढाव, बाला गंगुले, गगन हाडा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*