Type to search

क्रीडा

दिवसअखेर भारत 3 बाद 224 धावा

Share

रांची । सलामीवीर रोहित शर्माचे दमदार शतक आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद 83 धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 224 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची दमदार भागीदारी करताना संघाला 200 चा पल्ला गाठून दिला. रोहितच्या 164 चेंडूत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117 धावा तर अजिंक्य 135 चेंडूत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. पहिला दिवस रोहित शर्मा आणि रहाणेने गाजवला.

भारताचे तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर रोहित आणि रहाणेने डावाला आकार दिला. चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 205 होती. त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे अवघी सहा षटके खेळवण्यात आली.

त्याआधी, कगिसो रबाडाने केलेल्या भेदक मार्‍यामुळे रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत आक्रमक खेळी करणार्‍या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर डीन एल्गरकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला पुजाराही भोपळा न फोडता माघारी परतला. कगिसो रबाडानेच पुजाराला बाद केले. विराट कोहली आणि रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीला पंचांनी पायचीत म्हणून घोषित केले. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 39 अशी झाली होती.

यानंतर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावले. या मालिकेतलं रोहितचे हे तिसरे शतक ठरले, तर कसोटी कारकिर्दीतले हे सहावे शतक ठरले. सलामीचे 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर रोहितने अजिंक्यच्या साथीने भारताचा डाव सावरला. खेळपट्टीवर पाय रोवल्यानंतर अजिंक्य आणि रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत त्याचा चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने 2 तर नॉर्ट्जेने 1 बळी घेतला..

रोहितने गावसकरांना टाकले मागे
रोहित शर्माने रांची कसोटीत दमदार शतक झळकावले. एका कसोटी मालिकेत दोनपेक्षा अधिक शतके झळकावण्याचा पराक्रम त्यानं केला आहे. त्याने या शतकासह मालिकेतील तिसरे शतक झळकावले आहे. 1970मध्ये गावसकरांनी ही कामगिरी केली होती. एकाच मालिकेत दोनपेक्षा अधिक शतके झळकावणारा रोहित गावसकरांनंतर दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे.

रहाणेचे वेगवान अर्धशतक
रोहित शर्माला रहाणेनं चांगली साथ दिली. त्यानं अवघ्या 70 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 21वे अर्धशतक आहे. भारतात त्याने सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे.

रबाडाची धुलाई
जायबंदी झालेल्या केशव महाराजच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जॉर्ज लिंडे याने एका बाजूने चांगली गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या स्पेलमध्ये 15 धावा देत दोन विकेट घेणार्‍या रबाडाची दुसर्‍या स्पेलमध्ये रोहित आणि रहाणेनं चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुसर्‍या स्पेलमधील चार षटकांत या दोघांनी 30 धावा वसूल केल्या.

भारताचे तीन फलंदाज झटपट बाद
वेगवान गोलंदाज कगिसो रबाडानं पहिल्या स्पेलमध्ये सात षटकं टाकली. त्याच चार षटकं निर्धाव होती. 15 धावा देत त्यानं दोन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला तंबूत धाडले. त्यानंतर नोर्तजे यानं कर्णधार विराट कोहलीला बाद केले. कोहलीनं फक्त 12 धावा केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!