Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्त्याचे रूंदीकरण होणार

Share

मालमत्ताधारकांना नोटिसा देण्याच्या सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याच्या रूंदीकरण प्रक्रियेने वेग घेतला असून, पहिला टप्पा चौपाटी कारंजापर्यंत करण्यात येणार आहे. तेथील मालमत्ताधारकांना तशा नोटिसा देण्याच्या सूचना आज महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिल्या आहेत.

दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, जुन्या कोर्टाची मागील बाजू, जुनी महापालिका इमारत, पंचपीर चावडी, बुरूडगल्ली ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा हा रस्ता आहे. सर्वाधिक वाहतूक असलेली, शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. जुने वाडे असल्याने रस्ते अरूंद आहेतच, शिवाय नव्याने झालेल्या इमारतींमध्ये वाहनतळ नसल्याने तेथे येणार्‍या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. विशेषतः दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा या भागात हा त्रास सर्वाधिक आहे.

त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण करण्याचे नियोजन मागील आठ वर्षांपूर्वीच झाले. त्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र येथील मालमत्ता रुंदीकरणासाठी पाडणे त्यावेळी महापालिकेला शक्य झाले नाही. मालमत्ताधारकांना विश्‍वासात घेण्यात महापालिका कमी पडली.

आता पुन्हा या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. माजी खा. दिलीप गांधी यांनी मध्यंतरी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत या रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत गांभिर्याने विचार करण्याबाबत महापौरांना सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त भालसिंग यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांनी या रस्त्याची व तेथे असलेल्या मालमत्तांची पाहणी केली.

त्यातील काही मालमत्ता धोकादायक इमारतीमध्ये येत असल्याचे लक्षात आले. तसेच शमी गणपतीचे मंदिर तेथे असल्याने संबंधित विश्‍वस्तांचे मतपरिवर्तन करण्याचेही ठरले. यासाठी येथील मालमत्तांना नोटिसा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्या जागा अधिग्रहित करण्यात येणार आहेत, त्यांना टीडीआर मार्फत मोबदला देण्याचा विचार आहे.

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक गर्दी असलेला आणि कायम वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरणारा दिल्लीगेट ते चौपाटी कारंजापर्यंतचा रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. ही पाहणी करताना उपायुक्त प्रदीप पठारे, अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे, शहर अभियंता विलास सोनटक्के, अभियंता के. वाय. बल्लाळ, माजी नगरसेवक दीप चव्हाण, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

दिल्लीगेटचा तिढा कायम – हे रुंदीकरण करताना तेथे उभे असलेले दिल्लीगेट पाडावे लागणार आहे. ते तसेच ठेऊन रुंदीकरण केले तरी वाहतूक कोंडीसह अपघाताचीही भिती आहे. मात्र दिल्लीगेट पाडण्यास काहींचा विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारावा लागेल किंवा दिल्लीगेटचे ते बांधकाम इतरत्र करून आठवणी कायम ठेवाव्या लागणार आहेत. नेमके काय करायचे, याबाबतचा निर्णय झालेला नाही.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!