दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शहर परिसरात दत्तजयंती उत्साहात साजरी

0

नाशिक | दि.३ प्रतिनिधी –दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात शहरात श्री गुरुदेव दत्तांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदाही दत्तजयंतीनिमित्त शहरातील विविध भागांमधील मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गोदाकाठावरील एकमुखी दत्त मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सव्वासहा वाजता मंदिरांमध्ये दत्त जन्माचा सोहळा पार पडला. सिडकोतील त्रिमूर्ती चौकाजवळील दत्तमंदिर परिसरात नंदकिशोर शैक्षणिक ट्रस्ट आणि अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

ठिकठिकाणी दत्तमंदिरांमध्ये भाविकांना सुंठ वड्यांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्तजयंतीपूर्वी घरोघरी आणि मंदिरांमध्येदेखील गुरुचरित्राचे पारायण सुरू होते. या पारायणाची आज सांगता झाली. इंदिरानगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीमधील दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

जास्वंदी ग्रुप आणि बागेश्री वाद्यवृंदाच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पूजा घ्या आपुल्या चरणावर या श्री दत्त वंदनेने मैफलीला सुरुवात झाली. त्यानंतर गायिका मंजुळा ग्रामोपाध्याय, नीलिमा जोशी, मीना गटणे यांनी दत्त भजने सादर केली. येतील गुरुराजे, दत्ता श्री अवधूता, दत्त दिगंबर दैवत माझे, गुरुदत्त पाहिले कृष्णातीरी, आली हो पालखी स्वामींची अशी भावमधूर गिते यावेळी सादर करण्यात आली.

LEAVE A REPLY

*