दिंडोरीतील नितळी पाडा येथील घटना : दाम्पत्ये खून प्रकरणी एकास दुहेरी जन्मठेप

0

नाशिक : वृद्ध दाम्पत्याचा निर्घृन खून केल्या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर यांनी आरोपीस दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

किसन नामदेव गवळी (रा. नितळी पाडा, ता. दिंडोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वर्षापुर्वी नितळी पाडा येथे हा प्रकार घडला होता. आरोपी गवळी याने वैद्य जयराम ठमा गवळी आणि सरपंच सरुबाई जयराम गवळी या दोघा वृद्ध दाम्पत्याचा कोयत्याने वार करून आणि दगडाने ठेचून निर्घृन खून केला होता.

या घटनेची सविस्तर माहिती अशी, जयराम गवळी हे रात्रीच्या वेळी आरोपीच्या घराजवळ फिरत होते. त्यामुळे माझ्या घरी का आला अशी कुरापत काढून आरोपी किसन गवळी याने संतापाच्या भरात जयराम यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करीत दगडाने ठेचून जयराम यांना मारून टाकले.

त्यानंतर आरोपीने सरुबाई यांच्यावरही कोयत्याने वार करून ठार मारले. दोघांचा खून केल्यानंतर रात्री 11.20 वाजेच्या सुमारास आरोपीने त्याच्या घराजवळील रहिवाशांना ही माहिती दिली. मात्र त्यांनी भितीपोटी ही बाब पोलिसांना कळवली नाही. सकाळी नाल्यात पडलेला जयराम यांचा मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर चौकशी करून किसन गवळी यास ताब्यात घेतले. पोलिसांनी गवळी याच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त केले. तसेच त्याच्या घराजवळ राहणार्‍या लक्ष्मण पाडवी आणि निवृत्ती पाडवी यांचे जाबजबाब नोंदवले.

न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. त्यात किसन गवळी विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. गायत्री पटणाला यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सहा साक्षीदार तपासले.

LEAVE A REPLY

*