दारूबंदीसाठी जिल्ह्यात ग्रामरक्षक दल

0

अभय महाजन : 15 मे पूर्वी प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी आणि वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 15 मे पूर्वी विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच घेण्यात येणार्‍या ठरावाच्या प्रती त्या त्या विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम 143 च्या पोट कलम (3) मधील कलमाचा आधार घेऊन जिल्हाधिकारी महाजन यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राजपत्रातील तरतूदीनुसार विशेष ग्रामसभा घऊन कशा प्रकारे ग्राम रक्षक दलाचे गठण करता येते, या दलाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रतेचे निकष, ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांची निवड, ग्रामरक्षक दलाचा अध्यक्ष आणि सदस्य-सचिव यांची निवड, दलाची मुदत, पदावधी, आणि नवीसन सदस्यांच्या नियुक्तींची व त्याच्या राजीनाम्याची कार्यपध्दती याचा मसुदा दिलेला आहे.

  जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी हे ग्रामरक्षक दल महत्त्वाचे योगदान देणार आहे. यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक गावात 15 मे पूर्वी विशेष ग्रामसभा घेऊन त्यात संबंधित गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची सूचना जिल्हाधिकारी महाजन यांनी केली आहे. या ग्रामसभेत ग्राम रक्षक दलाच्या स्थापनेचा ठराव घेऊन तो त्या -त्या विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला शनिवारी प्राप्त झाले असून हे पत्र सर्व ग्रामपंचायतींना तातडीने पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी दिली.

LEAVE A REPLY

*