दारुबंदीसाठी वारकरी मंडळाचे राज्यव्यापी आंदोलन

0

नाशिक : दारुबंदीसाठी जीवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांना राज्य सरकार संरक्षण देत नसल्याने टाळ-मृदुंगासह रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध करण्याचा निर्णय वारकरी महामंडळाने घेतला आहे. एप्रिलपासून हे आंदोलन करण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला.

हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीला वारकरी महामंडळाचे महासचिव प्रभाकर फूलसुंदर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, महामंडळाचे जिल्हा सचिव पुंडलिकराव थेटे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, डॉ.पी. के. पाटील, बाळासाहेब वीरकर, महामंडळाचे प्रचारप्रमुख राम खुर्दळ, गणेश सोनवणे, सुरेश भोर आदी उपस्थित होते. राज्यभर दारुबंदी व्हावी यासाठी विविध संघटना त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतात.

परंतु अजूनही अशा प्रयत्नांना अपेक्षित यश येऊ शकलेले नाही. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अनेक संतांनी व्यसनाधिनतेवर त्यांच्या अभंगांमधून कोरडे ओढले आहेत. जनजागृतीचे प्रभावी साधन असलेल्या कीर्तन, भारूड, प्रवचन अशा अनेक माध्यमांचा वापर दारुबंदी चळवळीसाठी केला जातो.

परंतु अजूनही सरकारने दारुबंदीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच वारकरी या महामंडळाच्या माध्यमातून सरकारविरोधात चळवळ उभारणार आहेत. टाळ-मृदुंग हाती घेऊन धरणे व तत्सम आंदोलनांद्वारे सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यातून या आंदोलनांना सुरुवात केली जाणार आहे. राज्यात ठिकठिकाणी अशी आंदोलने केली जाणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

*